चंद्रपूर - सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील परिसरात आज एक वाघ मृतावस्थेत आढळला. ही घटना ब्रम्हपुरी वनविभागातील सिंदेवाही वनपरीक्षेत्रांतर्गत येणाऱ्या रत्नापूर बिटात घडल्याचे आज उजेडात आले. या वाघाचा मृत्यू इतर वाघाशी झालेल्या झुंजीत झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दोन वाघाच्या झुंजीत मृत्यू?
ब्रह्मपुरी वनविभाग सिंदेवाही वनपरीक्षेत्र नवरगाव क्षेत्र कार्यालय रत्नापूर बिटात आज सकाळी 9च्या सुमारास वाघ मृतावस्थेत दिसून आला. सदर वाघ 5 ते 6 वर्षांचा असून दोन वाघाच्या झुंजीत मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. या वाघाचे शवविच्छेदन करून त्याची रीतसर विल्हेवाट लावली जाणार आहे.
जंगल पडू लागले अपुरे
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांना जंगल अपुरे पडू लागले आहे. अशावेळी वाघ आपले आपला परिसर सुरक्षित करण्यासाठी इतर वाघाशी लढतो. यात कमकुवत वाघाचा मृत्यू होतो. ही घटनादेखील याच प्रकारची असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.