राजुरा(चंद्रपूर) - विरुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या नवेगाव नियतवनक्षेत्रातील कक्ष क्रमांक 145 मध्ये मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या एका वृद्धावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात नवेगाव येथील बाबुराव लक्ष्मण जिवतोडे ( 70 वर्ष) गंभीर जखमी झाले आहेत.
सध्या मोहफुले वेचण्याचा हंगाम सुरू आहे. परंतु लाकडाऊनमुळे या हंगामापासून बरेच मजूर वंचित झाले आहे. तसेच या भागात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. तरीपण संधी साधून काही लोक मोहफुल गोळा करण्यासाठी जंगलात जात आहे. शनिवारी सकाळी नवेगाव येथील बाबुराव जीवतोडे आपल्या सूनेसोबत सिद्धेश्वर उपक्षेत्रातील नवेगाव नियत क्षेत्राचे कक्ष क्रमांक 145 मध्ये मोहफुले गोळा करण्यासाठी गेला होता.
मोहफुल गोळा करीत असतानाच दबा धरून असलेल्या वाघाने अचानकपणे बाबूराव यांच्यावर हल्ला केला आणि ते बांबूच्या राझींवर जाऊन पडले. मात्र, लगेच उभे होऊन आरडाओरड केल्याने वाघ तेथून पळून गेला. बाबुराव यांचा जीव वाचला मात्र, वाघाने केलेल्या हल्ल्यात बाबूराव यांच्या खांद्यावर, पाठीवर जखमा झाल्या आहेत.
या घटनेची माहिती मिळताच विरुर वन परिक्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे, क्षेत्र सहायक धोडरे, वनरक्षक अनिल चौधरी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ जखमी बाबुरावला राजुरा ग्रामीण रुग्नालयात हलविले. घटनास्थळाच्या पंचनाम्यानुसार वाघाचे पायाचे ठसे आढळून आले आहेत. याठिकाणी कॅमेरे लावण्यात येत असून लोकांना जंगलात जाण्यास मनाई करण्यात येत आहे, असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.