चंद्रपूर - महाऔष्णिक वीज केंद्रात ज्या नागरिकांच्या जमिनी गेल्या त्यांना अद्याप नोकरी मिळालेली नाही. वारंवार पाठपुरावा करून अखेर हे प्रकल्पग्रस्त वीज निर्माण केंद्राच्या चिमणीवर चढले. नोकरीवर घ्या नाही तर आत्महत्या करू, असा इशारा त्यांनी दिला. चिमणीवर चढलेल्या आठजणांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे.
महाऔष्णिक वीज केंद्रातील प्रकल्पग्रस्त चढले चिमणीवर चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्रासाठी मोठ्या प्रमाणात आजूबाजूची जमीन हस्तगत करण्यात आली. ज्यांची जमीन गेली त्या प्रकल्पग्रस्तांना विनाअट नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, असे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे. मात्र, प्रत्यक्ष जमीन गेल्यानंतर त्यांना नोकरीसाठी शैक्षणिक पात्रतेची अट घालण्यात आली. यादरम्यान त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून मानधन तत्वावर घेण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणूनच ठेवण्यात आले आहे. या काळात अनेकांना वयोमर्यादा पूर्ण झाल्याचे कारण देत बाद केले जात आहे, असे आरोप त्यांनी केले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकल्पग्रस्त थेट नोकरीत रुजू करण्याची मागणी करत आहेत. मात्र, अजूनही त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे आज आठ प्रकल्पग्रस्त थेट आठ क्रमांकाच्या वीज निर्मिती संचाच्या चिमणीवर चढले. विशेष म्हणजे यात महिलांचाही समावेश आहे. ही बाब लक्षात येताच सर्वांची पळापळ सुरू झाली. जर आम्हाला नोकरी नाही दिली तर आम्ही उडी घेऊन सामूहिक आत्महत्या करू, असा इशारा प्रकल्पग्रस्तांना दिला. सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांना माहिती मिळताच त्या घटनास्थळी पोचल्या. त्यांनी फोनवर संपर्क करत या प्रकल्पग्रस्तांची समजूत काढली व राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशीही संपर्क केला. या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन राऊत यांनी दिले. सध्या हे प्रकल्पग्रस्त चिमणीवरच आहेत.
ऊर्जामंत्र्यांनी दिले बैठकी आमंत्रण -
या प्रकरणाची माहिती डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिली. या प्रकल्पग्रस्तांचा विषय आपल्यापर्यंत पोचलाच नसल्याचे उर्जामंत्र्यांनी सांगितले. मात्र, यावर तोडगा काढण्यासाठी प्रकल्पग्रस्तांची बैठक घेण्याची तयारी मंत्र्यांनी दर्शवली आहे. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असेही ते म्हणाले.