चंद्रपूर - एकाच वेळी 50 ते 60 मृतदेह जाळण्याचे ठिकाण उभारण्यासाठी महापौर आणि पदाधिकाऱ्यांनी तेथे भेट दिली. त्या भेटीवेळी त्या ठिकाणी चिता जळत होत्या. तरीही त्या भेटीचा व्हिडिओ बनविण्यात आला होता. तो व्हिडिओ व्हायरल झाला असून यावर सर्वत्र संताप व्यक्त केले जात आहे.
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे. सध्या रुग्णांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत नाही उपचाराअभावी त्यांचा मृत्यू होत आहे. मात्र, 340 कोटी बजेट असलेली महापालिका एक रुग्णालयही उभारू शकले नाही. तिकडे कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना जेवण पुरविण्यासाठी पैसे नाहीत, अशी सबब देत कंत्राटदाराची बिले रोखली जातात. दुसरे वाहन घेण्यासाठी निधी नसल्याने भंगारमध्ये गेलेल्या वाहनाला पुन्हा परवानगी देऊन शवावाहिका म्हणून वापरावे लागते आहे. मात्र, महापालिकेच्या तिजोरीतील हा खळखळाट केवळ सामान्य नागरिकांसाठी आहे. पण, अशा आणिबाणीच्या काळात देखील चंद्रपूर महापालिकेने आपल्या प्रसिद्धीसाठी कुठलीही कसर बाकी ठेवली नाही. या चमकोगिरीसाठी मनपाने नागपूर येथील आयटी क्राफ्ट नामक कंपनीला वर्षाकाठी 24 लाख 60 हजारांचे कंत्राट दिले आहे. याचा कळस म्हणजे जिथे जीव वाचविण्याची गरज आहे तिथे मरणाची तयारी महापालिका करत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृतांचा आकडा वाढत आहे. अशावेळी स्मशानभूमीची सुविधा कमी पडत आहे. भविष्यात मृतांची संख्या आणखी वाढेल. त्यामुळे एकाच वेळी 50 ते 60 मृतदेहावर अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्यांचे हे कर्तव्यच आहे, त्यात दिव्य असे काहीच नाही. महापौर राखी कंचर्लावार यांनी पठाणपुरा येथील स्मशानभूमीवर भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उपाआयुक्त विशाल वाघ, स्थायी समिती सभापती रवी आसवाणी, महापौर यांचे पती नगरसेवक संजय कंचर्लावार हे देखील होते. याचे चित्रीकरण करण्यात आले व जाहिरात असल्यासारेखे ते व्हायरल करण्यात आले. यावर नागरिकांमधून संताप व्यक्त केले जात आहे.
महापौरांच्या डागाळलेल्या प्रतिमेला सुधारण्याचा प्रयत्न