महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपुरात १० कोरोना रुग्ण वाढले; २५ अ‌ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू - चंद्रपूर लेटेस्ट न्यूज

जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपर्यंत १० कोरोना रुग्ण वाढले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७२वर पोहोचली आहे. यापैकी ४७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या २५ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

Chandrapur Corona Update
चंद्रपूर कोरोना अपडेट

By

Published : Jun 26, 2020, 4:37 PM IST

चंद्रपूर-जिल्ह्यामध्ये गुरुवारी एकाच दिवशी १० कोरोनाबाधितांची भर पडली आहे. गुरुवारी सायंकाळी दोन व रात्री उशिरा आठ अशा एकूण दहा बाधितांचा यात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंतची कोरोनाबाधितांची संख्या ७२ झाली आहे.

या 10 जणांमध्ये वरोरा येथील सुभाषनगरमधील औरंगाबाद येथून परत आलेल्या एकोणवीस व पंचवीस वर्षीय दोन बहिणींचा समावेश आहे. २४ तारखेला त्यांचे नमुने घेण्यात आले होते. २५ जूनला रात्री उशिरा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वरोरा तालुक्यातील वाघनख या गावातील मुंबईवरून परत आलेले व गृह विलगीकरणात असणारे ६४ वर्षीय पती व ५४ वर्षीय पत्नी दोघांचे २४ तारखेला घेतलेले नमुने पॉझिटिव्ह आले.

वरोरा शहरातील अभ्यंकर नगर परिसरातील ३२ वर्षीय महिला व ३७ वर्षीय पुरुष हे दोघे हैदराबादवरून २२ तारखेला परतले होते. २२ तारखेपासून गृह विलगीकरणात होते. त्यांचे २४ तारखेला स्वॅब घेण्यात आले होते. ते देखील पॉझिटिव्ह आले आहेत.

वरोरा तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी असणारे ६५ वर्षीय व्यक्तीदेखील पॉझिटिव्ह ठरले आहेत. त्यांचा स्वॅब नमुना २४ तारखेला घेण्यात आला होता. तर चंद्रपूर शहरातील पठाणपुरा भागातील एका कोरोनाबाधिताच्या २७ वर्षीय पत्नीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. गुरुवारी सायंकाळी बल्लारपूर येथील कन्नमवार वार्डमधील २८ वर्षीय युवक पॉझिटिव्ह आढळला आहे. हैदराबाद येथून शहरात परतल्याची त्याची नोंद आहे. हा युवक १६ जूनपासून संस्थात्मक विलगीकरणात होता.

चंद्रपूर शहरातील बाबू पेठ परिसरातील २७ वर्षीय युवतीचा स्वॅब गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे. यवतमाळ येथून २१ जून रोजी परत आल्यानंतर ही युवती गृह विलगीकरणात होती. बुधवारी तिचा स्वॅब नमुना घेण्यात आला. अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७२ झाली आहे. आतापर्यत ४७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे ७२ पैकी अ‌ॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या आता २५ झाली आहे. सर्व कोरोनाबाधितांची प्रकृती स्थिर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details