चंद्रपूर :ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील उपसंचालक कार्यालयातील वाहनचालक राकेश चौधरी याला जुगार खेळताना पोलिसांनी अटक केली होती. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्राचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांनी जुगार खेळल्याप्रकणी कारणे दाखवा नोटीस चौधरी बजावली आहे. सोबतच चौधरी याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेतील कंत्राटी कामगार सेना जिल्हा कार्याध्यक्ष कैलाश तेलतुंबडे यांनी केली आहे. या संदर्भातले निवेदन त्यांनी उपसंचालक पाठक यांना दिले आहे, त्यामुळे आता चौधरीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्याता आहे.
कर्मचाऱ्यांना घेऊन जुगार खेळतो :चौधरी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प (बफर) क्षेत्राचे उपसंचालकाचा वाहनचालक म्हणून कार्यरत होता. यापूर्वीचे उपसंचालक गुरुप्रसाद यांचे वाहन तो चालवायचा. उपसंचालकाचा चालक म्हणून तो अधिकारी, कर्मचाऱ्यांना धास्तीत ठेवायचा. तो राकेश चौधरी 4 एप्रिलला तुकुम येथील मोगरे नावाच्या व्यक्तीच्या घरी जुगार खेळतांना आढळुन आला होता. यावेळी वनविभागाचे दोन कर्मचारी देखील त्याच्या सोबत होते. याबाबतची गुप्त माहिती दुर्गापूर पोलिसांना मिळाली. यावेळी डीबी पथकाचे पोलीस कर्मचारी सुनील गौरकार आणि त्यांच्या चमूने थेट या ठिकाणी धाड टाकली. यावेळी पाच जणांना जुगार खेळताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून 11 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यात तीन जण हे वनविभागात कार्यरत आहेत. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पोलीस विभागाने देखील कमालीची गुप्तता पाळली होती, मात्र हे वृत्त ईटीव्ही भारतच्या हाती लागली. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच वनविभागात खळबळ उडाली. ताडोबाचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांनी यांची त्वरित दखल घेत चौधरीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.