महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाबा आमटेंची नात, आनंदवन प्रमुख डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या; राहत्या घरी घेतले विषारी इंजेक्शन - sheetal amte suicide

वरोरा तालुक्यातील बाबा आमटे यांच्या आनंदवनात डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली आहे. त्या महारोगी सेवा समितीच्या सीईओ होत्या. समाजसेवक विकास आमटे यांच्या त्या कन्या आहेत. प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचा वारसा त्या पुढे नेत होत्या.

डॉ. शीतल आमटे आत्महत्या
डॉ. शीतल आमटे यांचा संशयास्पद मृत्यू; चंद्रपुरात घेतला अखेरचा श्वास

By

Published : Nov 30, 2020, 1:58 PM IST

Updated : Nov 30, 2020, 7:45 PM IST

चंद्रपूर - ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे- करजगी यांनी विषारी इंजेक्शन घेतल्याचे समोर आले आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनी आनंदवन येथील राहत्या घरी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या आत्महत्येनंतर सामाजिक वर्तुळ हादरले आहे. त्या ३९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती गौतम करजगी आणि ५ वर्षांचा मुलगा शार्विल, आमटे कुटुंब आणि मोठा आनंदवन परिवार आहे.

शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्त्व त्यांच्या हातात होते. गेल्या काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त समोर आले आहे. त्यांनी विषारी इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.

कौटुंबीक कलह सोशल मीडियावर

डॉ. शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात त्यांनी महारोगी सेवा समितीच्या विश्वस्तांवर आणि कार्यकर्त्यांवर आरोप केले होते. त्यानंतर या व्हिडिओवरुन मोठी खळबळ उडाली होती. आनंदवनातील वाद समोर आला होता. त्यानंतर आलेल्या दबावानंतर डॉ. शीतल आमटे यांनी काही वेळात व्हिडिओ मागे घेतला. त्यानंतर डॉ. विकास आमटे, प्रकाश आमटे, मंदा आमटे आणि भारती आमटे यांनी एकत्रित पत्रक काढून डॉ. शीतल आमटे यांनी केलेले आरोप फेटाळून लावले होते. तेव्हापासून त्या प्रचंड दुःखी होत्या असे सांगितले जाते. मानसिक धक्का बसल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते, असेही सांगितले जात आहे.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित -

वयाच्या चाळिशीच्या आत केलेल्या कामाबद्दल ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने मार्च 2016 मध्ये ‘यंग ग्लोबल लीडर’ म्हणून त्यांची निवड केली होती. एप्रिल 2016 मध्ये त्यांना सयुंक्त राष्ट्र सघांने नवाचार राजदूत म्हणून निवड केली होती. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये एक्सपर्ट नेटवर्क ऑन ह्युमॅनिटिरिटी रिस्पॉन्स म्हणूनही त्या हातभार लावत होत्या. तसेच त्या ‘SABI’ मध्ये सक्रिय सहभागी होत्या.

आनंदवनाची जबाबदारी एकहाती सांभाळत होत्या

बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. शीतल आमटे या संपूर्ण आनंदवनची जबाबदारी सांभाळत होत्या. आपल्या आजोबांचा वारसा पुढे चालवणाऱ्या डॉ. शीतल आमटे यांनी 2003 मध्ये नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं शिक्षण घेतलं. त्यांनी सामाजिक उद्यमता (सोशल आंत्रप्रनरशिप) हा अभ्यासक्रम पूर्ण केला. याचबरोबर फायनान्शियल मॅनेजमेंटचेही शिक्षण त्यांनी घेतले आहे. हेमलकसा, आनंदवन, सोमनाथ येथील संस्थांचं वित्त नियोजनही त्याच करत होत्या.

असे सुरू होते काम

आनंदवनाला स्मार्ट व्हिलेज करणे हा त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. तांत्रिक, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या गावांना सक्षम करुन स्मार्ट व्हिलेज करणे हे या मागची कल्पना होती. वैद्यकीय क्षेत्रातील तरुणांना सामाजिक कार्यात आणण्यासाठी त्यांनी मशाल आणि चिराग या उपक्रमांची सुरुवात केली होती. त्यांनी २०१५ मध्ये निजबल नावाच्या सेंटरची सुरुवात केली होती. त्याअंतर्गत अपंगत्व असलेल्या नागरिकांना स्वावलंबी करणे आणि प्रशिक्षण कार्यक्रम घेणे हा उद्देश होता. आनंद मुकबधिर विद्यालय आणि आनंद अंध विद्यालय याचेही काम त्यांनी बघितले. डॉक्टरी सेवा करताना सोशल आंत्रप्रेनरशिपवर त्यांचा भर होता.

कोविड योद्धा म्हणून केले काम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. शीतल आमटे यांनी राज्य सरकारने सुरू केलेल्या ऑनलाइन प्रशिक्षणात सहभाग नोंदवला होता. कोविड योद्धा म्हणून त्या काम करत होत्या आणि इतरांनाही त्याप्रमाणे काम करण्यास मार्गदर्शन करत होत्या. सरकारने लॉकडाऊन घोषित करण्यापूर्वीच त्यांनी आनंदवनात उपाययोजना राबवल्या होत्या.

अभियंता गौतम करजगी यांच्याशी विवाह

शीतल आमटे यांनी अभियंता आणि व्यवस्थापन तज्ज्ञ गौतम करजगी यांच्याशी २५ ऑक्टोबर २००७ मध्ये लग्न केले होते. ते वरोरा येथील महारोगी सेवा समितीचे विश्वस्त आहेत आणि व्यवस्थापन व आनंदवन स्मार्ट व्हिलेज प्रकल्प पाहतात. त्यांना एक 5 वर्षाचा मुलगा शार्विल आहे.

बाबा आमटेंनी केली होती आनंदवनाची स्थापना

प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे आणि पत्नी साधना आमटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात वरोऱ्याजवळ आनंदवनाची स्थापना केली होती. १९४९ मध्ये त्यांनी आश्रमाची स्थापना केली. या आश्रमामुळे समाज नाकारत असलेल्या कुष्ठरोग्यांना हक्काचा आश्रय मिळाला. बाबा आमटे यांनी त्यांनी मनोभावे सेवा केली. त्यांना जगण्याची नवी उमेद दिली. त्यांना त्यांच्या पायावर उभे केले. त्यांनी आश्रमाला स्वयंपूर्ण केले. बाबा आणि साधनाताई यांच्या अतोनात श्रमांतून आनंदवन उभे राहिले. आनंदवनातील काम बघून देणगीदारांनी मदतीचा ओघ सुरु केला. दोघांच्या निधनानंतर अनंदवनाची धुरा त्यांचे चिरंजिव विकास आमटे यांच्याकडे आली. त्यांनी काही काळ आनंदवनाचा कारभार बघितला. त्यानंतर त्यांचा मुलगा कौस्तुभ यांच्याकडे आनंदवानाची सुत्रे आली. परंतु, आनंदवनातील कौटुंबीक कलहामुळे डॉ. शीतम आमटे यांच्याकडे सुत्रे देण्यात आल्याची चर्चा होती. तेव्हापासून डॉ. शीतल आमटे स्वतः आनंदवनाचा कारभार बघत होत्या.

Last Updated : Nov 30, 2020, 7:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details