महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sardpar Village Story : ना ग्रामपंचायत, ना सरपंच, ना शासनाच्या योजना; जाणून घ्या 'या' अनाथ गावाची गोष्ट

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील सरडपार या गावाची नोंद अद्याप शासनाच्या रेकॉर्डमध्ये नाही. सरडपार या गावात ग्रामपंचायतच अस्तित्वात नसल्यामुळे गावकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच शासनाची एकही योजना या गावापर्यंत पोहचत नसल्यामुळे हे गाव विकासापासून वंचित आहे.

Sardpar Village Story
सरडपार

By

Published : Mar 18, 2023, 5:52 PM IST

Updated : Mar 18, 2023, 7:09 PM IST

पाहा, सरडपार गावाचा विशेष रिपोर्ट

चंद्रपूर :आजवर माणसे अनाथ झाल्याचे आपण ऐकले किंवा वाचले असाल. मात्र, एक गाव पोरके झाल्याचे कदाचितच ऐकले, बघितले किंवा वाचलेही असेल. पण हे खरे आहे. कारण चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात असे एक गाव आहे, जे नावाने फक्त गाव आहे, मात्र, शासनाच्या रेकॉर्डमध्ये हे गावच नाही. 2015 पासून या गावाचे अस्तित्वच शासन दरबारी नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील या गावाचे नाव आहे सरडपार असे आहे.

विकासापासून वंचित : सरडपार या गावात ग्रामपंचायतच नसल्याने हे गाव अनेक समस्यांच्या विळख्यात आहे. कारण विकास करण्यासाठी ग्रामपंचायत सारखे कुठले प्रशासनच नसल्याने नाले, रस्ते, स्वच्छता या सगळ्यांचे तीन तेरा वाजले आहेत. येथील नागरिक शासकीय योजनांपासून वंचित आहे. मुलांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो आहे. दाखला मिळण्यासाठी त्यांना पायपीट करावी लागते. येथील नागरिक गेल्या आठ वर्षांपासून टाहो फोडत आहे. मात्र शासन दरबारी त्यांचा आवाज अद्यापही पोहोचलेला नाही.

असा निर्माण झाला पेच :1962 पासून तर 2015 पर्यंत हे गाव ग्रामपंचायतच्या अंतर्गत येत होते. सोनेगाव, काग आणि सरडपार ही तीन गावे मिळून ग्रामपंचायतचा कारभार सुरू होता. मात्र, 2015 मध्ये चिमूर शहराला नगर परिषदेचा दर्जा मिळाला आणि त्यानुसार सोनेगाव आणि काग ही दोन्ही गावे चिमूर नगर परिषदेत समाविष्ट करण्यात आली. मात्र, चार किलोमीटर अंतराचे कारण सांगून सरडपार या गावाला नगरपरिषदेत समाविष्ट करण्यात आले नाही. तेव्हापासून या गावाचा वाली कोण हे अद्यापही ठरले नाही.

कमी लोकसंख्या समस्येचे कारण? : कुठलीही ग्रामपंचायत होण्यासाठी त्या गावाची लोकसंख्या ही एक हजारपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. ती कमी असल्यास दुसऱ्या एका गावाला जोडून अशा ग्रामपंचायतीला मान्यता दिली जाते. मात्र, सरडपार या गावाची लोकसंख्या केवळ 700 आहे. त्यामुळे या निकषात देखील बसत नसल्याने सरडपार गावातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे.

जवळील ग्रामपंचायतीत समाविष्ठ करा : सरडपार या गावातील नागरिकांनी आम्हाला जवळच्या कुठल्या तरी ग्रामपंचायतीत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी केली होती. मसली आणि नेरी ही दोन्ही गावे सरडपार गावापासून जवळ आहेत. यापैकी मसली ग्रामपंचायतीने सरडपार या गावाला आपल्या ग्रामपंचायतीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव ग्रामसभेत मांडला होता. 2019 मध्ये केलेला हा प्रस्ताव शासनाकडे मंत्रालयात पाठविण्यात आला. यानंतर मसली ग्रामपंचायतीची निवडणूक झाली आणि नवीन सरपंच आणि नवे सदस्यांची नेमणूक झाली. याच दरम्यान तब्बल दोन वर्षांनी शासनाला जाग आली आणि हा प्रस्ताव आता जुना झाला असून नव्याने प्रस्ताव पाठवावा अशी सूचना त्यांनी केली. मात्र नव्या आलेल्या सदस्यांनी याला विरोध केला तसेच ग्रामसभेत सरडपार या गावाला आपल्यात सामावून घेण्यात येऊ नये, असा प्रस्ताव केला आणि त्यामुळे सरडपार गावातील लोकांच्या आशेवर पाणी फिरले गेले.

आमदार महोदयांचा इगो हर्ट? : चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया 2018 मध्ये सरडपार या गावी एका भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आले होते. यादरम्यान गावातल्या काही वयोवृद्ध नागरिकांनी भांगडीया यांची चांगलीच कान उघडणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ग्रामपंचायतची मागणी करत आहोत. आम्हाला प्यायला स्वच्छ पाणी नाही, पथदिवे नाही, रस्ते नाही मात्र आपण आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. आपण आज करतो उद्या करता म्हणून आश्वासन देता मात्र अद्याप आमचे काहीच झालेले नाही असे म्हणत त्यांनी आपला संताप भांगडीया यांच्यासमोर व्यक्त केला. मात्र, भांगडिया यांनी त्यांचा हा संताप समजून न घेता आडमुठेपणाची भूमिका घेतली. आमदारांचा इगो हर्ट झाल्याने त्यांनी या गावाच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले. आता नागरिक त्यांच्याकडे जात असता मी प्रयत्न करतोय असेच आश्वासन दिले जाते. मात्र चार वर्षे झाली अद्यापही काही तोडगा निघालेला नाही, असे येथील नागरिक सांगतात.

प्रशासनाची उदासीनता : चिमूर येथे उपजिल्हाधिकारी तसेच उपविभागीय कार्यालय आहे. सरडपार या गावाची परिस्थिती सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती आहे. त्यांच्यासाठी हा पेच दूर करणे फार मोठी गोष्ट नाही. मात्र एका गावाला त्यांच्या उदासीनतेमुळे आठ वर्ष विकासापासून दूर राहावे लागते आहे. प्रशासनाने वेळीच हालचाली केल्या असत्या तर 2015 पासूनच्या असलेल्या समस्या मार्गी लागल्या असत्या असे स्थानिकांचे मत आहे.



समस्यांचा डोंगर : सरडपार या गावापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर उमा नदी असल्याने येथे पिण्याच्या पाण्याची तशी चणचण नाही, कारण गावात अनेक विहिरी आहेत. मात्र पावसाळ्यात या विहिरींत गाळ साचतो. मात्र, गाळचा उपसा करण्यासाठी ग्रामपंचायतच नाही. पावसाळा आला की जलसाठ्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकून निर्जंतुकीकरण केले जाते. मात्र येथील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागते आहे. पावसाळ्यात तुंबलेल्या नाल्यांचे दूषित पाणी रस्त्यावर पसरून त्याचा चिखल होतो. त्यातून दुर्गंधी येते तसेच अनेक रोग देखील पसरतात. आरोग्याचे तीन-तीन वाजल्याने या गावातील काही नागरिक आजाराने मरण पावल्याच्या देखील घटना येथे घडल्या आहेत. तसेच 2015 नंतर येथे एकही रस्ता तयार झाला नाही, त्यामुळे गावात रस्ता शोधावा लागतो.
येथील नागरिक शासकीय योजनांपासून वंचित आहेत.



हेही वाचा : Hailstorm In Akola District अकोला जिल्ह्यात गारपिटीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Last Updated : Mar 18, 2023, 7:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details