चंद्रपूर -भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरने दोन दिवस जंगल सफारीचा आंनद घेऊन ताडोबाचा निरोप घेतला आहे. सचिन आपल्या कुटुंबासह ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात दाखल झाला होता. 'बांबू हट' नावाच्या रिसॉर्टमध्ये सचिन परिवारासह मुक्कामाला होता.
हेही वाचा -..प्रश्न सुटला का?
ताडोबा हे जगप्रसिद्ध अभयारण्य आहे. येथील वाघांना पाहण्यासाठी अनेक लोक गर्दी करतात. सचिनला या व्याघ्र प्रकल्पाची भूरळ आहे. तो अनेकदा कुटुंबासह येथे येत असतो. नागपूर येथील खासदार क्रीडा महोत्सवानिमित्त सचिन विदर्भात आला होता. त्यामुळे या व्याघ्रप्रकल्पामध्ये परिवारासह त्याने दोन दिवसीय जंगल सफारीचा बेत आखला.
व्याघ्रप्रकल्पामध्ये दाखल झाल्यानंतर, कोलारा गेटमधून सचिनने जंगल सफारीला जाण्याचे निश्चित केले. या सफारीत त्याला वाघाने हुलकावणी दिली. दुसऱ्या दिवशी सचिनने मदनापूर गेटमधून प्रवेश केला. या परिसरात असणाऱ्या अनेक नयनरम्य ठिकाणी जाऊन त्याने आनंद लूटला. या सफारीत त्याला वाघाचे दर्शन झाले.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीसुद्धा सचिनने सकाळी जंगल सफारी केली. त्यावेळी त्याच्यासोबत वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी होते. या सफारीनंतर, त्याने थोडी विश्रांती घेतली. निरोप घेण्यापूर्वी, त्याने चिमूर विधान सभेचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांची भेट घेतली. रिसॉर्ट सोडताना त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी खूप गर्दी केली होती.