चंद्रपूर- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत पुनवर्सन करण्यात आलेल्या पळसगाव येथील सात कुटुंबाना अपात्र ठरविण्यात आले आहे. या सात कुटुंबांनी जोपर्यंत पात्र ठरविले जात नाही तोपर्यंत गाव सोडणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे हिंस्र प्राण्यांच्या सावटाखाली या सात कुटुंबाना जगावे लागत आहे.
भद्रावती तालुक्यातील पळसगाव हे गाव ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येत असल्याने या गावाचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया 2016 पासून सुरू झाली. मात्र, येथील सात कुटुंबांना जिल्हास्तरीय पुनर्वसन कार्यकारी समितीने अपात्र ठरविले. यामध्ये भाऊजी आडे, देविदास ढवळे, चंद्रसेन ढवळे, ज्योत्स्ना मडावी यांना अपात्र ठरविण्यात आले. तर वनिता नैताम, शंकर पेंदाम, रत्नमाला निकुरे यांना यादीतून वगळण्यात आले.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर झाडे आणि पीडितांच्या प्रतिक्रिया या कुटुंबांकडे पात्र ठरण्यासाठी सर्व आवश्य कागदपत्रे असतानाही ते दुसऱ्या गावाचे रहिवासी असल्याचे सांगत त्यांना पुनर्वसनाचा लाभ नाकारण्यात आला. त्यांचे शेत आणि घर याच गावात असल्याने त्यांनी गाव सोडण्यास नकार दिला. तेव्हापासून हे सात कुटुंब या गावात आहेत. चहुबाजूंनी घनदाट जंगल आणि तेथे हिंस्र प्राण्यांचा वावर आहे. या हिंस्र प्राण्यांच्या सावटात हे कुटुंब राहत आहेत. या भीतीपोटी हे सर्व एकाच घरी राहत आहेत.
वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी या लोकांना त्रास देत आहेत. त्यांची वीज जोडणी बंद करण्यात आली, पिण्याच्या पाण्याचे हातपंप उखडून टाकले. तसेच तुम्ही हे गाव त्वरित सोडून जा, नाहीतर कुठला हिंस्र प्राणी मरण पावला तर आम्ही तुम्हाला जबाबदार धरू आणि तुरुंगात टाकू असा सज्जड दम त्यांना भरण्यात येतो. यामुळे हे सर्व कुटुंब दहशतीत आहे. या सर्व कुटुंबानी आज आयोजित पत्रकार परिषदेत आपली कैफियत मांडली. या सर्व पीडितांना जोपर्यंत पुनर्वसन प्रक्रियेत सहभागी केले जात नाही तोपर्यंत याविरोधात संघर्ष करण्याची भूमिका संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर झाडे यांनी घेतली.