चंद्रपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढती रुग्णसंख्या बघता जिल्हा प्रशासनाने पुढील दहा दिवसांसाठी टाळेबंदीचा निर्णय घेतला आहे. यानुसार पुढील दहा दिवस चंद्रपूर शहरासह ऊर्जानगर ग्रामपंचायतीत याची अंमलबजावणी होणार आहे. 17 ते 26 जुलै दरम्यान ही संचारबंदी असणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
काय राहणार बंद?
चंद्रपूर महानगर, ऊर्जानगर, दुर्गापुर या भागात उद्या (गुरुवार) 17 जुलैपासून ते 21 जुलैपर्यंत या पहिल्या पाच दिवसात कोणतेही दुकाने, आस्थापने, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने तसेच भाजी मार्केटही बंद राहणार आहे. तर 21 ते 26 या कालावधीत पुढील पाच दिवसांसाठी केवळ अत्यावश्यक व खाद्य वस्तूंची पुरवठा करणारी दुकाने, कृषी साहित्य केंद्रे सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत फक्त सुरू राहतील. शाळा महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोणत्याही प्रकारचे शिकवणी वर्गांना 17 ते 26 जुलैदरम्यान दहा दिवस पूर्णतः बंद असणार आहे.
यासोबत सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहने संपूर्णता बंद राहतील. तसेच लग्न समारंभ, स्वागत समारंभही बंद राहतील. या कालावधीमध्ये यापूर्वी कोणी परवानगी घेतली असेल तरीही ती रद्द समजण्यात येणार आहे. सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापना आणि कार्यालये संपूर्णतः बंद राहतील. धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे बंद राहतील. नित्यनेमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित फक्त धर्मगुरू, पुजारी यांना करता येतील.
डॉ. कुणाल खेमणार (जिल्हाधिकारी, चंद्रपूर) पुढील बाबी सुरु असतील -
या काळामध्ये घरपोच दुधाचे वितरण फक्त सकाळी सहा ते दहा वाजेदरम्यान करता येईल. सर्व खासगी आणि सार्वजनिक वैद्यकीय सेवा पशुचिकित्सालय, सर्व रुग्णालय, मेडिकल, दवाखाने, पेट्रोल पंप सुरू असतील. सर्व शासकीय कार्यालय सुरू राहतील. एलपीजी गॅस सेवा, घरपोच गॅस वितरण, रेशन दुकान नियमानुसार सुरू राहील. वर्तमानपत्र वितरण सकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये करता येणार आहे. राष्ट्रीयकृत आरबीआयची मान्यता दिलेल्या बँका, सहकारी बँका, गाव पातळीवर विविध कार्यकारी सोसायट्या, एलआयसी कार्यालय, किमान मनुष्यबळात सकाळी नऊ ते दुपारी दोन या कालावधीत सुरू राहतील.
बँकेच्या ग्राहक सेवा, एटीएम केंद्र सुरू राहील. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना आपली वाहने कार्यालयीन वेळेत वापरता येतील. मात्र, त्यांनी आवश्यकतेनुसार आपले ओळखपत्र पोलिसांना दाखविणे गरजेचे राहील. अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या सर्वांनी तसेच आशा वर्कर, मेडिकल शॉपचे कर्मचारी, वर्तमानपत्र, प्रिंट इलेक्ट्रॉनिक, डिजिटल मीडियामध्ये काम करणारे कर्मचारी यांनी स्वतःच्या कार्यालयाचे, आस्थापनांचे ओळखपत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे.