पोलिसांनी सभेला बोलाविले अन् चालान देऊन परत पाठविले
पोलिसांनी बोलाविले असल्याने वाहनधारक धावून गेले. मात्र, पोलीस ठाण्यात गेलेल्या वाहनधारकांच्या हातात चालान पावती देत पोलिसांनी स्वागत केले. पोलिसांच्या या स्वागताने वाहनधारक पुरते गोंधळले.
राजुरा(चंद्रपूर) - पोलिसांनी महत्त्वाची सभा असल्याचे सांगत चारचाकी वाहनधारकांना पोलीस पाटलाकरवी बोलावणे पाठविले. पोलिसांनी बोलाविले असल्याने वाहनधारक धावून गेले. मात्र, पोलीस ठाण्यात गेलेल्या वाहनधारकांच्या हातात चालान पावती देत पोलिसांनी स्वागत केले. पोलिसांच्या या स्वागताने वाहनधारक पुरते गोंधळले.
राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथील चारचाकी वाहनधारक, मालकांना विरुर पोलिसांनी पोलीस पाटिलांमार्फत वाहनासह पोलीस ठाण्यात बोलाविले. महत्त्वाची सभा असल्याचे सांगितल्याने वाहनधारक, मालक पोलीस ठाण्यात हजर झाले. गेल्यागेल्याच ठाणेदारांनी वाहनांचा कागदपत्राची पूर्तता नसल्याचे कारण पुढे करित 500 ते 2500 रुपयाचे चालान वाहन धारकांचा हाती दिला. या प्रकाराने वाहनधारक पुरते गोंधळले. काहींनी आक्षेप घेतला. मात्र पोलिसांसमोर त्यांचे काही चालत नव्हते. अखेर पोलिसांनी ठोठावलेला दंड वाहनधारकांनी मुक्याट्याने भरला अन् भरलेल्या दंडाची पावती घेऊन घरी परतले.या प्रकारावर वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे.