चंद्रपूर -सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे बिबट्याने ९ महिन्यांच्या बाळाला घरातून उचलून त्याच्या नरडीचा घोट घेतला होता. त्यामुळे वनविभागाने तात्काळ कारवाई करत बिबट्याला जेरबंद केले. मात्र, वनविभागाने केलेल्या कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण गुरुवारी रात्री पुन्हा बिबट्याने गडबोरी येथे अंगणात झोपलेल्या एका महिलेला ठार केले. गयाबाई पैकू हटकर असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला आहे.
चंद्रपुरात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच; वृद्धेला केले ठार, वनविभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
गडबोरी येथे नेहमीप्रमाणे घरचे सदस्य अंगणात झोपले होते. रात्री बिबट्या तेथे आला. त्याने गयाबाई हटकर यांच्यावर हल्ला केला यात त्यांचा मृत्यू झाला.
गडबोरी येथे नेहमीप्रमाणे घरातले सदस्य अंगणात झोपले होते. रात्री बिबट्या तिथे आला. त्याने गयाबाई (६५) यांच्यावर हल्ला केला यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार घडत असताना आजूबाजूच्या कुटुंबातील सदस्यांना याचा सुगावा लागला नाही. आज सकाळी उठल्यानंतर कुटुंबातील व्यक्तींना गयाबाई दिसल्या नाहीत. त्यांच्या खाटेवर रक्त होते. घरच्यांनी शोध घेतला असता त्यांचा मृतदेह गावाजवळच्या नर्सरीत आढळला. बिबट्याने त्यांना फरफटत नेले होते.
परिसरात एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. बिबट्याला पकडल्याचा वनविभागाचा दावा किती फोल आहे हे या घटनेतून दिसून आले आहे.