महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

HandCart Patent In Chandrapur : दहा वर्ष अथक मेहनत, अन् तयार केले हातठेल्याचे पेटंट - नाविन्यपूर्ण हातगाडी पेटंट चंद्रपूर

कामगारवर्गाचा त्रास कमी करण्यासाठी चंद्रपूर येथील एका प्राध्यापकाने नाविन्यपूर्ण हातगाडी तयार ( HandCart Patent In Chandrapur ) केली. योगेश लक्ष्मण येनारकर असे या प्राध्यापकाचे नाव आहे. दहा वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी हातगाडीचे पेटंट तयार केला आहे.

HandCart Patent In Chandrapur
HandCart Patent In Chandrapur

By

Published : Jan 23, 2022, 3:31 AM IST

चंद्रपूर -असंघटित क्षेत्रातील कामगारवर्ग म्हणजे उपेक्षित, दुर्लक्षित असा वर्ग. या वर्गाच्या अनेक समस्या आहे. मात्र, त्यांचे कष्ट आणि अडचणी कमी करण्यासाठी दुर्दैवाने ठोस असे प्रयत्न झाले नाही. हा त्रास एका घटनेच्या माध्यमातून एका प्राध्यापकाच्या लक्षात आला आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. दहा वर्षांच्या अथक परिश्रमानंतर अखेर एक नाविन्यपूर्ण हातगाडी तयार करण्यात या प्राध्यापकाला यश ( Professor Creat Handcraft ) आले आहे. या नाविन्यपूर्ण हातगाडीच्या पेटंटवर आता त्यांच्या नावाचा शिक्कामोर्तब झाला ( HandCart Patent In Chandrapur ) आहे. या हातगाडीने कामगार-श्रमिकांचे श्रम, वेळ आणि कष्ट कमी होण्यास मदत तर होणार आहे. त्याशिवाय वाहतुकीची समस्या आणि अपघात कमी होण्यास देखील मोठी मदत होणार आहे. योगेश लक्ष्मण येनारकर असे या प्राध्यापकाचे नाव ( Professor Yogesh Yenarkar ) आहे

अशी सुचली कल्पना

योगेश येनारकर हे मुळचे चंद्रपुरचे. कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी मेकॅनिकल पदवी मिळविली. त्यानंतर ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 26 वर्षांपासून ते विद्यार्जनाचे कार्य करीत आहेत. 2011 ला एक घटना त्यांच्यासोबत घडली ज्यातून पुढे या नव्या हातगाडीचे मॉडेल तयार झाले. येनारकर हे कारमधून जाताना सर्वसामान्य नागरिकांना जो त्रास व्हायचा तो त्यांनाही व्हायचा, तो म्हणजे भर रस्त्यात येणाऱ्या हातगाड्यांचा. या हातगाड्या बाजूला होण्यास श्रमिकाला मोठा त्रास असायचा. ही संपूर्ण गाडीच या कामगाराला उचलून बाजूला करावी लागायची. त्यात इतर वाहनचालकांची ओरड वेगळीच. त्यामुळे या हातगाडीवर काहीतरी प्रयोग करायला हवा, अशी कल्पना येनारकर यांना सुचली आणि त्यांनी कामास सुरुवात केली.

योगेश येनारकर यांच्याशी संवाद साधताना प्रतिनिधी

पेटंटसाठी दहा वर्षांचा संघर्ष

आपल्या सहकारी विद्यार्थ्यांना घेऊन येनारकर यांनी प्रयोग सुरू केला. त्यात अमित मुत्यालवार, सतीश लोखंडे या विद्यार्थ्यांची मोलाची साथ मिळाली. 2011 पासून सुरू झालेल्या या प्रयोगात वारंवार बदल करावे लागले. पेटंटसाठी याचा अहवाल सादर करताना अनेक त्रुटी निघाल्या. मात्र, अभियांत्रिकी कौशल्यांनी त्यावर मात करत तब्बल दहा वर्षांचे कष्ट कामी आले आणि अखेर 30 एप्रिल 2021ला जागतिक पातळीवर येनारकर यांना हातगाडीचे पेटंट मिळाले.

काय असते पेटंटची प्रक्रिया

पेटंट मिळविणे हे साधे, सहज आणि सहज काम मुळीच नाही. जागतिक पातळीवर नाविन्यपूर्ण असे योगदान द्यावे लागते. यासाठी देशात इंडियन पेटंट ऑफिस आहे. येथे आपली संकल्पना आधी नोंदणीकृत करावी लागते. यानंतर इंडियन पेटंट जर्नल नामक शोधप्रबंध पुस्तिकेत ते प्रकाशित केले जाते. त्याचा संपूर्ण तांत्रिक तपशील द्यावा लागतो. जो प्रयोग आपण करतोय यापूर्वी असा कोणी प्रयोग केलाय का याची चाचपणी केली जाते. त्यावर तज्ज्ञ लोक आक्षेप नोंदवतात, असे आढळल्यास ती संकल्पना आणि प्रयोग बाद होतो. आणि त्यात नाविन्यपूर्ण असेल तर त्यात सुधारणा केली जाते. अंतीम टप्प्यात त्याची न्यायालयाप्रमाणे सुनावणी होते. या संपूर्ण प्रक्रियेत संकल्पना तावून सुलाखून निघाली अशाच संकल्पनेला जागतिक पातळीवर पेटंटची मान्यता दिली जाते. या संपूर्ण प्रक्रियेतुन येनारकर यांच्या हातगाडीला पेटंट मिळाले आहे.

नव्या हातठेल्याची वैशिष्ट्ये
हातगाडी चालवणारे आणि त्यावर उदरनिर्वाह करणारे बहुतांश शहराच्या बाहेर झोपडपट्टीत राहतात. त्यांना आपल्या वस्तू विकण्यासाठी पाच ते दहा किलोमीटर जावे लागते. तेवढाच वेळ परत जाण्यासाठी लागतो. रस्त्यावर येणारी कोणतेही वाहनांचे एक प्रमाणित स्वरूप असते. त्यात रिक्षा सुद्धा आल्या. परंतु, हातगाडीला असे कोणतेही प्रमाण नाही. तिला हॅंन्डल असतो. तो ढकलण्यासाठी नाही तर उचलण्यासाठी त्याची रचना केली असते. त्यामुळे ती निश्चितच सोयीची नसते. मात्र, त्यावर कुठला पर्याय नसतो. यावर प्रयोग करून येनारकर यांनी त्यात हलणारा हँडल लावला, सोयीस्कर होण्यासाठी पॅडल लावला, त्यावर सीट लावली, ब्रेक, आरसे, रेडियम अशा सर्व गोष्टी त्यांनी त्यात टाकल्या. थोडक्यात काय तर आरटीओला रस्ता सुरक्षेसाठी अपेक्षित साऱ्या गोष्टींनी हातगाडी सुसज्ज करण्यात आली.

काय सांगतो रस्ते वाहतुक मंत्रालयाचा अहवाल

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या ( Road And Highway Ministry ) 2019 च्या अहवालानुसार, जनावर ओढून नेणारी वाहन आणि हातगाड्या सदृश्य वाहनांमुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण ७. ५ ते ८.८ एवढे आहे. हे हातठेले हाताळण्यास तेवढे सोयीस्कर नसल्याने हे अपघात घडत असतात. म्हणून येनारकर यांच्या हातठेल्याची संकल्पना महत्वाची मानली जात आहे. यामुळे कामगारांचे श्रम तर कमी होणार आहे. तसेच, अपघाताच्या घटना कमी होण्यासही मदत मिळणार आहे.

कंपन्यांशी करार करण्यासाठी प्रयत्न

अखेर दहा वर्षांच्या प्रयत्नांनी येनारकर यांच्या कल्पनेला मूर्तरूप प्राप्त होऊन जागतिक स्तरावर त्याची नोंद घेतली गेली. भविष्यात अशा चार ते पाच हातगाड्या तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासोबत एखाद्या कंपनीशी करार करून या हातगाड्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत

हेही वाचा -Maharashtra Tableau 2022 : यंदा राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दाखवणार 'जैवविविधता'

ABOUT THE AUTHOR

...view details