चंद्रपूर :महाविकास आघाडी राज्यभरात वज्रमुठ सभेचे आयोजन करत आहे. 16 एप्रिल रोजी नागपूर येथे ही वज्रमुठ सभा होणार आहे. मात्र त्यापूर्वीच किरकोळ कारणे देऊन येथे सभा घेण्यात येऊ नये, असे प्रयत्न विरोधकांकडून करण्यात येत आहेत. मात्र ही सभा झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले. वज्रमुठ सभेच्या आयोजनाकरिता आयोजित कार्यक्रमासाठी ते चंद्रपुरात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
शिंदे सरकारच्या काळात धार्मिक तेढ वाढली :शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यात धार्मिक उन्माद वाढला आहे. अवकाळी पावसाने शेतकरी कोलमडला असताना मुख्यमंत्र्यासह राज्याचे अख्खे मंत्रिमंडळ अयोध्येला गेले. अयोध्येला जायला विरोध नाही, परंतु शेतकरी त्यांच्यासाठी महत्वाचे नाही. आता तरी शेतकऱ्यांना ठोस मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.
राज्यात एकूण सहा सभा होणार :पक्षाचा आढावा घेण्यासाठी देशमुख बुधवारी चंद्रपुरात होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. १६ एप्रिल रोजी नागपुरात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हजारो कार्यकर्ते सहभागी होतील. महाविकास आघाडीच्या राज्यात एकूण सहा सभा होणार आहेत. नागपूर आणि कोल्हापूर या दोन ठिकाणच्या सभेची काँग्रेस पक्षाकडे जबाबदारी आहे. पुणे व नाशिकची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. संभाजीनगर आणि मुंबई या दोन सभांची जबाबदारी उद्धव ठाकरे शिवसेनाकडे आहे. संभाजीनगर येथील प्रचंड सभा बघून भाजप नागपुरातील सभेला विरोध करीत आहे. मात्र नागपुरातील सभामैदानाचे शुल्क भरून स्थळ निश्चित केले आहे.