सुधाकर मोकादम माहिती देताना चंद्रपूर British Era Watch :देशात इंग्रजांचे राज्य होतं, त्याच काळात विदेशातील अनेक वस्तू देशात विक्री करण्यासाठी यायच्या. त्या काळात घड्याळीचं विशेष महत्व होतं. एखाद्यानं महागडं घड्याळ घेणं, हा प्रतिष्ठेचा विषय मानला जात होता. अशीच घड्याळ अंदाजे शंभर एक वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील पांडुरंग आबाजी मोकादम यांनी खरेदी केली होती. ही घड्याळ अमेरिकन बनावटीची आहे. घड्याळ खरेदी केली तेव्हापासून तब्बल सहा पिढ्यांचा प्रवास या घड्याळीनं पूर्ण केला आहे. अजूनही हे घड्याळ सुस्थितीत सुरू आहे. सुधाकर मोकादम यांनी या दुर्मिळ घड्याळीचं जतन केलं आहे.
सहा पिढ्यांचा प्रवास :वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील जळगाव येथील निवासी पांडुरंग बाबूजी मोकादम यांनी हे घड्याळ खरेदी केलं होतं. यानंतर त्यांचं पुत्र निळकंठ मोकाम यांनी या घड्याळाची देखभाल दुरुस्ती केली. त्यांना घड्याळ सुधारावता येत होतं. त्यामुळं काही बिघाड आल्यास ते स्वतःच हे घड्याळ दुरुस्त करत होते. तब्बल 85 वर्षांचे असेपर्यंत त्यांनी या घड्याळाची दुरुस्ती केली. मात्र, यानंतर त्यांना दिसायला कमी लागल्यानं या घड्याळाची दुरुस्ती होत नव्हती. 2012 मध्ये त्यांचं निळकंठ मोकादम यांचं निधन झाल्यानंतर सुधाकर मोकादम यांनी हे घड्याळ आपल्या चंद्रपूरच्या घरी आणलं. सुधाकर मोकादम हे देखील आता वयोवृद्ध झाले आहेत.
चंद्रपुरात केवळ एकच कारागीर :पूर्वीच्या घड्याळाची वेगळी बनावट असायची. त्याचं तंत्रज्ञान देखील वेगळं होतं. सुधाकर मोकादम यांनी चंद्रपुरात हे घड्याळ आणल्यानंतर ते सुधारण्यासाठी त्यांनी अनेक घडाळ्याची दुकानं फिरलीत. मात्र त्यांना हे घड्याळ दुरूस्त करणारा एकही कारागीर भेटला नाही. मात्र एक दिवस त्यांना बंगाली कॅम्प परिसरात खालिद भाई नामक कारागीर भेटला. त्यांना हे घड्याळ सुधारायचं कसं हे माहिती होतं. 2012 ला त्यांनी बंद पडलेलं घड्याळ सुरू करून दिलं होतं. यानंतर त्यात कधीही बिघाड झाल्यास ते दुरुस्त करून देत होते. मात्र आता तेही वयोवृद्ध झाल्यानं त्यांना ते काम करणं शक्य नाहीय. त्यांच्या डोळ्यानं त्यांंना स्पष्ट दिसत नसल्यानं त्यांनी घड्याळ दुरुस्तीचं काम बंद केलंय. त्यामुळं ही घड्याळ कोण दुरुस्त करणार असा प्रश्न मोकादम यांना पडलाय.
'ही' आहेत घड्याळाची वैशिष्ट्ये : ही घड्याळ अमेरिकन बनावटीची आहे. वेळ दाखवण्यासोबतच दर तासाला घड्याळाचा गजर वाजतो. तसंच आपल्याला कोणाताही गजर यात सेट करता येतो. या घड्याळाला तीन प्रकारच्या चाव्या आहेत. त्यानं या घडाळाची सेटिंग करता येते.
शासकीय संग्रहालयाला भेट देण्याचा मानस : चंद्रपुरात हे घड्याळ दुरुस्त करून देणारा आता एकही कारागीर उरला नाही. पुढं हे घड्याळ बंद पडल्यास ते सुधारता येणार नाही. त्यामुळं ही घड्याळ सुरू राहावी, पुढच्या पिढीला ह्या दुर्मीळ घड्याळाबाबत माहीती मिळावी, अशी इच्छा मोकादम यांनी व्यक्त केलीय. या घड्याळीचं योग्य जतन व्हावं असं देखील सुधाकर मोकादम यांनी म्हटलंय. त्यामुळं शासकीय अथवा खासगी संग्रहालयाला, घड्याळ भेट देण्याची ईच्छा सुधाकर मोकादम यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली आहे.