चंद्रपूर- अंकुर कंपनीच्या बियाण्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या इतर समस्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ९ ऑगस्टला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मूख्यमंत्री तथा वनमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, शासनाकडून या समस्यांची दखल घेण्यात आली नाही. यावर निषेध नोंदवत मनसेकडून तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांना बैलाचा साज (झूल) देण्यात आले.
शासनाच्या शेतीविषयक उदासीनतेबाबत मनसेचे आंदोलन चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अंकुर कंपनीचे प्रभाकर हे वान पेरले होते. मात्र ते उगवलेच नाही. यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अन्य तालुक्यातून देखील अशाच प्रकारच्या तक्रारी येत आहेत. याबाबत कृषी विभागाने याची मोका चौकशी करून बिज सदोश असल्याचा अहवाल दिला. मात्र, अद्याप अंकुर कंपनीवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी आहे.
त्याचबरोबर वन्यप्राण्यांनी केलेल्या शेत पिकांची नुकसान भरपाई प्रत्यक्ष झालेल्या नुकसानाच्या प्रमाणात द्यावी, नुकसान भरपाईची मर्यादा रद्द करावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, चिमूर तालूका दुष्काळग्रस्त घोषीत केल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान द्यावे, इत्यादी मागण्यांसाठी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या पिकांची वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसान भरपाईची अट रद्द करणे, तसेच ज्या प्रमाणात नुकसान झाले त्याचे तेवढी नुकसान भरपाई देण्यासंबधातील अधिकार वनमंत्र्यांना असते. मात्र असे असतानाही त्यांनी कारवाईसाठी मूख्य वन संरक्षकांकडे प्रकरण वर्ग केले. त्यामुळे शासनाच्या सुस्तपणाच्या विरोधात मुख्यमंत्री तथा वनमंत्र्यांना पोळ्या निमीत्त झुल देण्यात आली.
हुतात्मा स्मारक येथून दुपारी १२.३० ला मोर्चास सुरुवात झाली. मुख्यमंत्री आणि वनमंत्री यांच्या दोन्ही झुली तथा निवेदन नायब तहसीलदार दरभे यांनी स्विकारले. या आंदोलनात मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत कोल्हे, जिल्हा सचिव भाऊराव डांगे, बंडू गेडाम आणि पीडित शेतकरी यात सहभागी होते.