चंद्रपूर - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनाबद्दल मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “पटेल यांच्या निधनाने एक विद्वान राजकारणी आणि एका अभ्यासू, बुद्धीमान व परखड नेतृत्वास देश मुकला आहे, अशा शब्दात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अहमद पटेल यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना वडेट्टीवार म्हणाले की, अहमद पटेल यांच्या निधनाने देशाचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. अहमद पटेल यांनी देशाची अविरतपणे आणि निस्वार्थी हेतूने सेवा केली आहे. त्यांनी समाजाची सेवा करत सार्वजनिक आयुष्यात अनेक वर्षे घालवली. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि काँग्रेसला सक्षम करण्यातील त्यांची भूमिका यांमुळे ते नेहमीच लक्षात राहतील. अहमद पटेल हे साधे गृहस्थ नसून, ते एक विद्वान राजकारणी होते. सर्वांत कठीण काळात ते पक्षासोबत उभे राहिले होते. मृदूभाषी, व्यवहार चतूर आणि नेहमी हसतमुख राहणे ही त्यांची वैशिष्ट्ये होती. अतिशय शांत, कुशाग्र आणि तीव्र राजकीय भान असलेले नेते होते. त्यांचे जाणे हे पक्षासाठी नुकसान करणारे आहे. पक्षाच्या प्रत्येक निर्णयात त्यांचा सहभाग होता. पक्षासाठी त्यांनी केलेले काम अत्यंत प्रशंसनीय आहे. जेव्हा कुणाला पक्षात त्यांच्या मदतीची गरज भासायची त्यावेळी त्यांच्या मदतीला धावून यायचे. पक्ष त्यांचे योगदान विसरू शकणार नाही.