चंद्रपूर - एकमेकांचा विरह सहन न झाल्याने विवाहित महिलेने प्रियकरासह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुनिता निळे आणि राजेश गेडाम अशी त्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी घुग्घुस पोलिसांचा तपास सुरू असून, दोघांचेही मृतदेहउत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
खळबळजनक..! चंद्रपूरमध्ये प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या
एकमेकांचा विरह सहन न झाल्याने विवाहित महिलेने प्रियकरासह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुनिता निळे व राजेश गेडाम अशी या दोघांची नावे आहेत.
सुनिता निळे हिचे नकोडा येथील अमित निळे यांच्याशी लग्न झाले होते. त्यांना ६ वर्षांचा मुलगा देखील आहे. मात्र, सुनीता ही नागपूर येथील राजेश गेडाम यांच्या प्रेमात होती. राजेशचेही लग्न झाले होते. मात्र, सुनीता आणि राजेश हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले होते, की त्यांना एकमेकांचा विरह असहनीय झाला. याच भावनेपोटी त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आणि आत्महत्या केली.
रविवारी राजेश हा नागपूरहून सुनीताला भेटायला चंद्रपूरला आला होता. दोघांनीही एकमेकांची भेट घेतली आणि आत्महत्येचा निर्णय घेतला. चंद्रपूर-घुग्घुस राज्य महामार्गावरील शेणगाव येथून काही अंतरावर असलेल्या मत्ते यांच्या शेतातील कडुलिंबाच्या झाडाला या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना समोर आली. घटनास्थळी राजेश गेडाम याची दुचाकी (एम.एच. ४० एई. १४३५) आढळली. याप्रकरणी घुग्घुस पोलिसांचा तपास सुरू आहे.