चंद्रपूर : जिल्ह्यातील मागील काही दिवसांपासून पावसाची मुसळधार बॅटींग सुरू ( Chandrapur Rain News ) आहे. यामुळे अनेक नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले ( Chandrapur Flood ) आहेत. या पुराचे पाणी हे नदी शेजारील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शिरले आहे. पुराचा फटका बसलेल्या गावातील नागरिकांचे मोठे हाल सुरु आहेत. खायला अन्न नाही, प्यायला स्वच्छ पाणी नाही अशावेळी जीवन जगण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे.
गावाला बेटाच स्वरूप - पुराने वेढलेल्या सकमुर गावाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. गावाचा चौफेर पाणीच पाणी. शेतबांध्याला तळ स्वरूप आले आहे. गावातील आरोग्य सुविधा कोडमडली आहे. पाणी टंचाईने नागरिकांना दाहीदिशा भटकावे लागत आहे. गावातील दुकानातील किराणामाल संपण्याचा मार्गावर आहे. त्यामुळे लहान-सहान वस्तूसाठी भरपुरातून सकमुर गावातील नागरिक मार्ग काढत आहेत. जिल्ह्यात महापुराने वेढा दिला आहे. धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सूरू आहे. त्यामुळे वर्धा, इरई, वैनगंगा नदीला पूर आले आहेत. नदीकाठी वसलेल्या गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. जिल्ह्यातील सकमूर गावाला पुराचा पाण्याने वेढा दिला. गावाला बेटाच स्वरूप आले. गावातील नागरिक गावातच अडकून पडले आहेत. भीषण पुरातून नावेने मार्ग काढीत गावकरी शेत गाठीत आहेत. आरोग्याची समस्या उद्भवली तर पुरातून मार्ग काढीत 7 किलोमीटरचा प्रवास नागरिक करीत आहेत. जिल्ह्यातील शहरी भागात प्रशासनाची मदत पोहचली मात्र पुरात अडकलेले गावखेडे अद्यापही मदतीचा प्रतिक्षेत आहेत.