चंद्रपूर: महाविकास आघाडीची सरकार कोसळेल असा आमदार किशोर जोरगेवार यांना विश्वास आहे. मात्र सत्ता आली तरी जोरगेवारांसाठी हा प्रवास इतका सुकर असणार नाही. कारण भाजपचे हेवीवेट नेते सुधीर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आहे. जर भाजपची सत्ता बसली तर मुनगंटीवार हे कॅबिनेट मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री असणार हे साहजिक आहे. त्यांच्या नेतृत्वातच जोरगेवार यांना काम करावे लागणार आहे. अशावेळी मुनगंटीवार किती जमवून घेतात यावरच जोरगेवार यांची भिस्त असणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी पून्हा सत्तेत बसली तर येथील घटक पक्षांकडून सहकार्य मिळेल काय हा प्रश्न आहे. तसेच जोरगेवार यांना जनेतेच्या नाराजीला समोर जावे लागेल. एकूणच जोरगेवार यांच्या समोर इकडे आड तिकडे विहीर असा राजकीय पेच निर्माण झाला आहे.
अन जोरगेवारांनी भाजप सोडली:भाजपमध्ये असताना किशोर जोरगेवार हे सुधीर मुनगंटीवार यांचे शिष्य समजले जात होते. मुनगंटीवार यांच्या सहवासात राहून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले. आजही जोरगेवार यांच्या राजकीय कार्यशैलीवर मुनगंटीवार यांची छाप आहे. मात्र त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाले ते 2014 ला. चंद्रपूर विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने जोरगेवार यांना संधी मिळण्याची आशा होती, यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, मुनगंटीवार यांनी देखील प्रयत्न केले. मात्र, नितीन गडकरी यांच्या जवळचे समजले जाणारे नाना श्यामकुळे यांना पुन्हा संधी देण्यात आली. यामुळे निराश होऊन जोरगेवार यांनी भाजपला रामराम करीत सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढावली व पराभूत झाले.
2019 ची राजकीय खेळी:यानंतर जोरगेवार यांनी सेना सोडत यंग चांदा ब्रिगेड या संघटनेची स्थापना करत मोर्चेबांधणी केली. त्यावेळी मुनगंटीवार हे राज्यातील पॉवरफुल नेते होते, अर्थ, वने, नियोजन या तिन्ही खात्याचे मंत्री होते. देवेंद्र फडणवीस नंतर दुसऱ्या क्रमांकाचे ते नेते आहेत. त्यामुळे मुनगंटीवार यांचा प्रभाव कमी करायचा असेल तर त्यांना चंद्रपुरात मात देणे आवश्यक होते. त्यासाठी फडणवीस गटाकडून जोरगेवार यांना राजकीय रसद पुरविण्यात आली. 2019 च्या निवडणुकीत पुन्हा जोरगेवार आणि भाजपचे नाना श्यामकुळे आमनेसामने आले. श्यामकुळे यांना निवडून आणण्यासाठी बल्लारपूर मतदारसंघ सोडून मुनगंटीवार यांनी चंद्रपूरात तळ ठोकला. मात्र मूळ नागपूरचे असलेले श्यामकुळे यांना पराभूत करण्याचा निर्णय जनतेने आधीच घेतला होता, त्यात भाजपच्या गटाने देखील हातभार लावला. ही सर्व मते जोरगेवार यांना मिळाली आणि ते विजयी झाले.
मुनगंटीवार-जोरगेवार यांच्यातील संघर्ष:2019 च्या विधानसभा निवडणूकीत पहिल्यांदाच राजकीय विरोधक म्हणुन मुनगंटीवार आणि जोरगेवार आमनेसामने उभे ठाकले. श्यामकुळे यांना जिंकविण्यासाठी मुनगंटीवार आक्रमक झाले होते आरोप-प्रत्यरोपाच्या फैरी झडल्या आणि यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. 2019 नंतर त्यांच्यात शासकीय कार्यक्रमावरून राजकीय मनापमानावरून राजकीय वातावरण तापले. भाजपशासित मनपाच्या कार्यक्रमात आमदार जोरगेवार यांना जाणीवपूर्वक डावलले जाऊ लागले, त्यामुळे देखील ते आक्रमक झाले. यानंतर राजकीय श्रेयवादाचा संघर्ष सुरु झाला. अमुक एक कामासाठी निधी आपल्यामुळे मिळाला असा दावा दोन्ही बाजूकडून करण्यात येऊ लागला. जोरगेवार यांनी अनेक विकासकामांसाठी पाठपुरावा केला. तर मुनगंटीवार हे ज्येष्ठ नेते असल्याने राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हा पाठपुरावा करीत होते. यात कधी जोरगेवार तर कधी मुनगंटीवार यांचे पारडे जड होते. त्यामुळे ही दरी आणखीनच वाढत गेली.