महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक; चंद्रपुरात 17 ते 20 जुलै दरम्यान लॉकडाऊन

चंद्रपूर शहरामध्ये कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, येत्या 17 जुलै ते 20 जुलै या चार दिवसांच्या काळात पूर्ण टाळेबंदी (लॉकडाऊन) केली जाणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिले आहेत.

chandrapur lockdown
रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक; चंद्रपुरात 17 ते 20 जुलै दरम्यान लॉकडाऊन

By

Published : Jul 15, 2020, 8:45 AM IST

चंद्रपूर - शहरामध्ये कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, येत्या 17 जुलै ते 20 जुलै या चार दिवसांच्या काळात पूर्ण टाळेबंदी (लॉकडाऊन) केली जाणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिले आहेत. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तुंसह सर्व दुकाने बंद असतील. ही टाळेबंदी केवळ चंद्रपूर शहरासाठी मर्यादित असेल. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी 17 ते 20 जुलै या काळात चंद्रपूर शहरात येऊ नये, शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन खेमनार यांनी केले आहे.

बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना संस्थात्मक अलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. नागरिकांनी माहिती लपविल्यास तसेच प्रशासकीय कामात अडथळा आणल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अत्यावश्यक सेवेची गरज भासल्यास बाहेर पडावे. मास्कचा वापर अनिवार्य असून योग्य पद्धतीने मास्क वापरले जावे. तसेच दैनंदिन काम करीत असताना सुरक्षित अंतर ठेवून काम करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

चेक पोस्टवर तपासणी आणखी कठोर करण्यात आली आहे. तपासणीच्या वेळेस नाव, मोबाईल नंबर, पत्ता देणे अनिवार्य असणार आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांवर योग्य उपचार केले जात असून, सर्व वैद्यकीय सोयी सुविधा कोविड केअर सेंटरमध्ये पुरविल्या जात आहे. जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही ही बाब समाधानाची आहे. लक्षणे आढळून आल्यास तत्काळ आरोग्य विभागाला माहिती देऊन तपासणी करणे गरजेचे आहे. कोणतीही अडचण, तक्रार व माहिती द्यायची असल्यास टोल फ्रि क्रमांक 1077 किंवा 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 204 आहे. जिल्ह्यातील बरे झालेल्या कोरोनाबाधिताची संख्या 103 मंगळवारी दुपारपर्यंत 6 बाधितांची नोंद झाली तर 101 बाधितांवर चंद्रपूरमध्ये उपचार सुरू असून, सध्या 24 कंटेनमेंट झोन सुरू आहेत.

लग्न बनले विघ्न -

जिल्ह्यामध्ये लग्न समारंभामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लग्न व समारंभ करण्यासाठी अनेक बंधने टाकली जाणार आहेत. नागरिकांनी लग्न व अन्य समारंभाचे आयोजन काही काळासाठी पुढे ढकलावे असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details