चंद्रपूर - चिमूर तालुक्यातील भिसी गावात मागील १५ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी महिला सरपंचाना घेराव घालून ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.
चंद्रपुरात पाण्याच्या समस्येचा भडका; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप - पाणी समस्या
चिमूर तालुक्यातील भिसी गावात मागील १५ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.
गावात मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी येत नाही. गावातील महिलांनी ग्रामपंचायत कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही पाणीपुरवठा सुरू झाला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नागरिकांनी सरपंच आणि उपसरपंचांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. मात्र, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्यामुळे महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात मडके, मातीचे रांजन फोडून आपला रोष व्यक्त केला. तसेच ग्रामपंचायतीला चपला जोड्याचा हार आणि कुलूप लावले.
यावेळी एका मोर्चेकरी महिलेने महिला सरपंच योगिता गोहणे यांच्यावर मारहाणीचा आरोप करून स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर सरपंच गोहणे यांनी मोर्चेकरी महिलांनी मला मारहाण केल्याची तक्रार दिली. दोन्ही तक्रारींची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.