चंद्रपूर- मागील ५ दिवसापासून जिल्ह्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे इरई धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे इरई धरणाचे सर्व म्हणजेच सातही दरवाजे उघडण्यात आले आहे. तरी नदीशेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून बचाव मोहिम राबविण्यात येत आहे. तसेच पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा आपत्ती निवारण कक्षाला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इरई हे धरण ९७ टक्के भरले असून हा दाब कमी करण्यासाठी धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे इरई नदीच्या जलपात्रात वाढ झाली आहे. तर शेजारील चिंचोळी, पाली, किटाळी, भटाळी, मीनगाव खैरगाव, विचोडा, अंभोरा, पडोली, कोसारा, वडगाव, दाताळा, चंद्रपूर, आरवट, माना तसेच इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गावकऱ्यांनी स्वतः आपली गुरे व इतर मालमत्ता नदीच्या पात्रापासून दूर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.