चंद्रपूर -अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळचे समजले जाणारे चिमूरचे आमदार बंटी भांगडीया यांनी जोरगेवार यांची मुख्यमंत्र्यांशी भेट करून दिली. जोरगेवार यांनी भाजपला समर्थन द्यावे, असा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवण्यात आला. याबाबत ते अनुकूल असून लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे.
निवडणुकीदरम्यान जोरगेवार-भांगडीयांची झाली गुप्त बैठक? निवडणुकीदरम्यान 16 ऑक्टोबरला जोरगेवार आणि आमदार बंटी भांगडीया यांची गुप्त बैठक झाली होती, अशी खात्रीशीर माहिती बाहेर येत आहे. विशेष म्हणजे त्यावेळी अपक्ष लढत असलेले जोरगेवार आणि भाजपचे उमेदवार नाना शामकुळे यांच्यात थेट लढत होती. भाजपच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढत असताना जोरगेवार यांना भांगडीया यांची चिमुरात जाऊन का भेट घ्यावीशी वाटली. त्यांच्यात झालेल्या चर्चेचा चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणाशी काही संबंध आहे का? याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
हेही वाचा - नागपुरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकरची संपत्ती जप्त
चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवार यांचा दबदबा आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपच्या चार जागा निवडून आल्या होत्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून पाहण्यात येत होते. मात्र, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली तर मुनगंटीवार यांना अर्थ, नियोजन आणि वने ही खाती मिळाली. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदही त्यांना मिळाले.
हेही वाचा - अमरावतीच्या तिवशात अशीही जीवघेणी परंपरा, जनावरांना खेळवून फोडली जातात फटाके
राज्यात आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी यावेळच्या निवडणुकीतही भाजपचे चांगले प्रदर्शन होणे गरजेचे होते. विशेषतः चंद्रपुरातुन नाना शामकुळे यांना निवडून आणण्यासाठी मुनगंटीवार यांनी शर्थीचे प्रयत्न केले. शामकुळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार असलेले किशोर जोरगेवार उभे होते. आपल्यावर भाजप सत्ताधाऱ्यांकडून दबाव आणला जात आहे, असा आरोपही जोरगेवार यांनी केला होता. याच दरम्यान 16 आक्टोबरला पहाटे जोरगेवार यांनी भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळचे समजले जाणारे बंटी भांगडीया यांची चिमूर येथील निवासस्थानी गुप्त भेट घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आत्तापर्यंत आपल्या सर्व प्रतीस्पर्ध्यांना येण-केण प्रकारे शह देण्याचा प्रयत्न केल्याची अनेक उदाहरणे आहेत. तसेच काहीसे चंद्रपुरातही होताना दिसते. भाजपच्या नाना शामकुळेंचा पराभव होणे हा मुनगंटीवारांसाठी धक्का आहे. तो किशोर जोरगेवारांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनीच तर दिला नाही ना, अशी चर्चा राजकिय वर्तुळात आहे.