चंद्रपूर - लॉकडाऊनमध्ये कामावर जात नाही म्हणून, पत्नीने चक्क पतीला मारहाण केल्याची घटना आज बंगाली कॅम्प परिसरात घडली. याविरोधात पतीने पोलीस स्टेशनपर्यंत पोचण्याचे धाडस दाखवले खरे मात्र परत घरी जाऊन पत्नीचा आणखी मार खावा लागेल, या भीतीपोटी आपली तक्रार मागे घेतली.
कामावर जात नाही म्हणून पतीला मारहाण; पत्नीच्या धाकाने पतीने मागे घेतली तक्रार
पती कामावर जात नाही आणि पैसे कमवून आणत नाही यामुळे वैतागलेल्या पत्नीने पतीला चांगलाच चोप दिला. नेमका त्याचा गुन्हा तरी काय या भावनेने तो पुरता भांबावून गेला. यात पतीचा स्वाभिमान जागृत झाला आणि त्याने थेट रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
कामावर जात नाही म्हणून, माझी पत्नी विनाकारण मारते आज तर याचा कळस गाठला. त्यामुळे तिच्यावर लवकर गुन्हा दाखल करावा अशी त्याची मागणी होती. त्यानुसार पतीला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. यानंतर मात्र पतीला पुढील चित्र आठवू लागले. तक्रार केली तरी शेवटी गाठ पत्नीशी आहे, हे त्याला कळून चुकले. पत्नीनेही त्याची समजूत काढली. कदाचित ती अप्रत्यक्ष धमकीच असावी. त्यानेही भविष्याचा संभावित धोका लक्षात घेता तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला. 'मियाँ बीवी राजी तो क्या करेगा काजी' या भूमिकेत पोलीस होते. त्यामुळे त्यांचाही नाईलाज होता.
अखेर पुन्हा असा प्रकार होऊ देऊ नका ही तंबी ह्या दाम्पत्याला पोलिसांनी दिली. आणि दोघेही घरी परतले. वरवरकरनी हा मजेशीर किस्सा वाटत असला तरी यातील गांभीर्य हे विचार करायला लावणारे आहे. आज लॉकडाउनमुळे गरीब लोकांचा संसार अडचणीत आलाय. काम आणि पैसा नसल्याने त्यांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. यातूनच असा कौटुंबिक कलह देखील निर्माण होत आहे. अशा घटना वाढण्यापूर्वीच कोरोनाचे संकट टळून जावे अशी या वर्गाची इच्छा आहे.