चंद्रपूर - जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आणखी 9 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्याच्या अतिरिक्त 5 भागात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. आता एकूण 7 प्रतिबंधित क्षेत्र घोषित झाले आहेत. सर्व पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर असून रुग्णांसंदर्भात चुकीची माहिती व प्रशासनाची बदनामी करणाऱ्या पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी जारी केलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 612 व्यक्तींची चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 513 नागरिक निगेटिव्ह आले आहे. आणखी 87 नागरिकांचे स्वॅब निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गुरुवारी सायंकाळपर्यंत 3 पॉझिटिव्ह रुग्ण होते. त्यात आणखी 9 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मात्र, हे सर्व रुग्ण संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन) करण्यात आले होते. त्यामुळे बिनबा गेट व दुर्गापूर हे प्रतिबंधीत क्षेत्र वगळता अन्य कोणताही भाग सील करण्यात आला नव्हता. मात्र, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी रात्री उशिरा आणखी 5 क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले. यामध्ये बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गाव, पोंभुर्णा तालुक्यामध्ये येणारे जाम तुकुम, सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा, मूल तालुक्यातील चिरोली, राजुरा तालुक्यातील लक्कडकोट या गावांचा समावेश आहे. या परिसरातील पॉझिटिव्ह नागरिकांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वयंप्रेरणेने आरोग्य विभागाकडे नावे द्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.