महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपुरात सूर्य कोपला.. मंगळवारी चंद्रपूरचे तापमान जगामध्ये सर्वाधिक !

शहराचे आजचे (मंगळवार) तापमान जगात सर्वाधिक म्हणजे ४७.८ डिग्री सेल्सिअस एवढे वाढले होते. जगामध्ये आज चंद्रपूर सर्वाधिक तापलेले शहर म्हणून गणले गेले.

चंद्रपुरात उच्चांकी तापमान

By

Published : May 28, 2019, 8:16 PM IST

Updated : May 29, 2019, 2:44 PM IST

चंद्रपूर- अंगाची लाही-लाही होणे काय असते, याचा प्रत्यय आज चंद्रपूरकरांना आला. शहराचे आजचे (मंगळवार) तापमान जगात सर्वाधिक म्हणजे ४७.८ डिग्री सेल्सिअस एवढे वाढले होते. जगामध्ये आज चंद्रपूर सर्वाधिक तापलेले शहर म्हणून गणले गेले. त्यापाठोपाठ पाकिस्तानमधील जाकोबाबाद व नागपूर महानगर तापले होते. या दोन्ही शहरांचे तापमान ४७.५ डिग्री सेल्सिअस होते.

चंद्रपुरात उच्चांकी तापमान

सध्या विदर्भात नवतपा (९ दिवस उन्हाची जास्त तीव्रता) सुरू असल्याने सूर्याचा सर्वाधिक प्रकोप येथे होत आहे. त्यातही चंद्रपूर जिल्ह्यात या उन्हाची दाहकता सर्वाधिक आहे. शहरात तापमानाने उच्चांकी गाठली असून नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. चंद्रपूर व परिसरात हल्ली पहाटे सात वाजता देखील लख्ख ऊन पडत असून अगदी सकाळपासूनच घामाच्या धारांना सुरवात होते. आज चंद्रपूर व परिसरात कर्फ्यू सदृश्य स्थिती होती. रस्त्यावर दुपारी अतिशय तुरळक लोक दिसत होती.

जिल्हा प्रशासनाने व महानगरपालिकेने यासंदर्भात नागरिकांना आधीच सतर्क केले असून फारच आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे सुचविले आहे. चंद्रपूर शहरांमध्ये महानगरपालिके मार्फत मोठ्या प्रमाणात थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था देखील वाटसरूंना थंड पाणी मिळेल यासाठी प्रयत्नरत असून प्रत्येक चंद्रपूरकर सुद्धा घरातून निघताना 'चेंज द बॉटल' या मोहिमेमध्ये सहभागी झालेला आहे.

सध्या शाळा कॉलेज बंद असल्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून शाळकरी मुलांचा बचाव होत आहे. तथापि, प्रशासनाने जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ऊन्हामुळे त्रास होणाऱ्यांसाठी विशेष कक्ष स्थापन केले आहे. नागरिकांनी त्याचा आवश्यकतेनुसार फायदा घ्यावा, असे आवाहन केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी काही दिवस ही उष्णतेची लाट कायम राहणार असून नागरिकांनी या काळामध्ये स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.

एरव्ही वर्दळ असलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट होता. अनेक लोक सावलीचा आसरा घेत होते. तर शीतपेयांच्या दुकानांकडे नागरिक गर्दी करत होते.

Last Updated : May 29, 2019, 2:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details