चंद्रपूर - घुग्घुस नगरपरिषदेच्या मागणीसाठी सुरू असलेला संघर्ष आता शिगेला पोचला आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येत आहे. आज ही मागणी घेऊन सर्वपक्षीय नेत्यांनी मुंडन करून अर्धनग्न आंदोलन केले. तसेच या मागणीसाठी आता स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांना साकडे घातले आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक त्वरित थांबवण्यात यावी आणि नगरपरिषदेची प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनीही केला पाठपुरावा -
घुग्घुसवासीयांची भावना लक्षात घेता येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुका रद्द करुन नगरपरिषद स्थापन करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्यात यावे, अशी मागणी जोरगेवार यांनी केली असून या संदर्भात त्यांनी आज मुंबई येथील मंत्रालयात त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी मुश्रीफ यांनीही या प्रकरणाची फाईल तत्काळ सादर करण्याचे निर्देश संबधित विभागाचे उपसचिव माळी यांना दिले आहे. त्यानुसार ही फाईल ग्रामविकासमंत्री राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पोहचती झाली असून त्यावर त्यांनी स्वाक्षरी करून ही फाईल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठवली आहे. तसेच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही या संदर्भात पाठपुरावा सुरु ठेवला आहे. परिणामी, याबाबत हरकती व सुचनाही मागविण्यात आल्या आहेत. मात्र, आता ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
सुचना व हरकती मागविण्यात आल्या -
३२ हजार ६५४ लोकसंख्या असलेले घुग्घुस हे गाव असून विविध महत्त्वाचे उद्योग येथे आहे. त्यामुळे नगर परिषदेसाठी पात्र असतानासुध्दा येथील कारभार हा ग्रामपंचायतीद्वारे चालवला जातो. त्यामुळे येथे नगरपरिषद निर्माण करण्यात यावी, अशी जुनी मागणी आहे. महाविकास आघाडी सरकारने या दिशेने हालचालीही सुरु केल्या आहेत. यासंदर्भात सुचना व हरकती मागविण्यात आल्या आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक ठराव पाठविला आहे. मात्र, हा ठरावा जुन्या आमसभेत घेण्यात आलेला असल्याने तो नगरपरिषदेच्या निर्मीतीला विरोध दर्शविनारा असल्याची माहिती यावेळी आमदार जोरगेवार यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिली.
तर ग्रामपंचायत निवडणूक रद्द होणे शक्य-
आजची परिस्थीती वेगळी असून आज पंचायत समिती व जिल्हापरिषद सदस्यांनी येथील नगर परिषदेच्या निर्मीतीसाठी होकार दिला असल्याचेही त्यांनी या चर्चेदरम्यान सांगितले. तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी घुग्घुस नगरपरिषदेच्या मागणीसाठी पंचायत समीतीच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकला असल्याचेही यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या लक्षात आणून दिले. या सर्व पार्श्वभूमीवर जानेवारीच्या ४ तारखेपर्यंत येथील नगरपरिषद निर्मीतीबाबत अध्यादेश जारी झाल्यास येथील ग्रामपंचायत निवडणूक रद्द होणे शक्य असून त्या दिशेने प्रयत्न करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. या संदर्भात जोरगेवार यांनी नगरविकास विभागाचे उपसचिव सतीश मोघे यांचीही भेट घेतली असून या विषयाला गती देण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - श्रीधाम एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा, प्रवाशांना नाहक त्रास