चंद्रपुरात स्वच्छतेच्या शिलेदारांच्या सत्कारासह धान्य किटचे वितरण; इको-प्रो संस्थेचा उपक्रम - grain kits
मातानगर, महाकाली वॉर्ड विभाग येथील नागरिकांनी परिसरातील 26 सफाई कर्मचाऱ्यांचा सामूहिक सत्कार केला. सोबतच या सर्वांना भेट म्हणून धान्य किट देण्यात आली.
चंद्रपूर - कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीतही काही वर्ग आपली सेवा इमानेइतबारे देत आहे. यामधील सफाई कामगारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्यामुळेच शहर स्वच्छ आणि नीटनेटके राहू शकते. या स्वच्छतेच्या शिलेदारांचा आज इको-प्रो संस्थेच्या प्रयत्नाने सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना आवश्यक धान्य किटचे वितरण देखील करण्यात आले.
कोरोनाच्या काळात संपूर्ण देश लॉकडाउन झालेला आहे. सर्व नागरिक आपआपल्या घरी राहून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र अशाही परिस्थितीत डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी अहोरात्र सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी प्रयत्नशील आहेत. त्यासोबतच महानगरपालिकेचे घंटागाडी सफाई कर्मचारी रोज आपल्या परिसरात येऊन आपल्या वाड्यातील कचरा संकलन करतात. त्यामुळे शहर स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे. या सफाई कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या वॉर्डातील कचरा संकलन करणारे कर्मचारी, सफाई कामगार यांचा सत्कार करून त्यांना आवश्यक मदत करावी, असे आवाहन इको-प्रो संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला साथ देत मातानगर, महाकाली वॉर्ड विभाग येथील नागरिकांनी परिसरातील 26 सफाई कर्मचाऱ्यांचा सामूहिक सत्कार केला. सोबतच या सर्वांना भेट म्हणून धान्य किट देण्यात आली.