चंद्रपूर : मुली लाईन देत नाहीत म्हणून तक्रारीचे पत्र स्थानिक आमदाराला पाठविणाऱ्या त्या अतिउत्साही कार्यकर्त्याला आमदार सुभाष धोटे यांनी आमंत्रण दिले आहे. मात्र, हा कार्यकर्ता अजूनही समोर आलेला नाही. धोटे यांनी या तरुणाचा शोध घेण्याचा आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. मात्र ना कार्यकर्ते त्याला शोधू शकले ना तो अजून समोर आलाय. त्यामुळे खोडसाळपणाच्या नावाने ही केवळ स्टंटबाजी तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. कारण यापूर्वी देखील असाच एक स्टंटबाजीचा प्रकार समोर आला होता. ज्यात बराक ओबामा, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या नावाने प्रमाणपत्रे जाहीर करण्यात आली होती.
नक्की भानगड काय आहे?
10 सप्टेंबरला एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं. स्थानिक आमदार सुभाष धोटे यांच्या नावाने हे पत्र होतं. ज्यात पत्राचा विषय 'गर्लफ्रेंड न पटण्याबाबत' असा होता. त्यात अर्जदार म्हणून भूषण जांबुवंत राठोड असे नाव होते.
त्या पत्रात लिहिले आहे, की "संपूर्ण तालुक्यात भरभरून मुली आहेत. पण, मला एकही गर्लफ्रेंड नसणे ही चिंतेची बाब आहे. यामुळे माझा आत्मविश्वास खचून गेला आहे. मी गडचांदूर ते राजुरा दररोज प्रवास करतो. परंतु मला एकही मुलगी पटत नाही. दारू विक्री करणाऱ्या, काळ्या-कुळ्या मुलांना मुली पटतात. हे बघून माझे मन जळते. तरी माझी विनंती आहे की आपल्या विधानसभा क्षेत्रातील युवतींना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. आमच्या सारख्यांना देखील भाव देण्यात यावा".