चंद्रपूर - चिमूर तालुक्यातील वडाळा पैकू या गावात कोरड्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्याचा अखेर बुधवारी रात्री मृत्यू झाला. तब्बल 6 दिवस हा कोल्हा विहिरीत पडून होता. मात्र वनविभागाकडून या कोल्ह्याला वाचविण्यासाठी कुठलेही ऑपरेशन राबविण्यात आले नाही. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे या कोल्ह्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी कारण्याची मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे.
कर्मचाऱ्यांची टोलवाटोलव
सध्या दुर्मीळ होत चाललेले कोल्ह्याचे वास्तव्य चिमूर तालुक्यातील वडाळा पैकू या परिसरात दिसून येते. हा परिसर प्रादेशिक वनविभागाच्या अंतर्गत येतो. 10 जूनला एक कोल्हा कठडे नसलेल्या कोरड्या विहिरीत पडला होता. त्याच्यामागे कुत्रे पाठलाग करत असताना तो 35 फूट खोल विहिरीत पडला. मुकबधीर शाळेच्या बाजूला हे ठिकाण आहे. शाळेचे मुख्याध्यापक रामदास कामडीही याच परिसरात राहतात. रात्री त्यांना विहिरीतून कोल्ह्याचा आवाज आला. त्यांनी जाऊन बघितले तेव्हा त्यांना कोल्हा दिसला नाही. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी त्यांना हा कोल्हा विहिरीत असल्याचे दिसले. ही माहिती त्यांनी पर्यावरणप्रेमी कवडू लोहकरे यांना फोन करून दिली. लोहकरे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ही माहिती वनपाल नरड यांना दिली. तसेच त्यांनी तत्काळ कोल्ह्याला वाचविण्याचे ऑपरेशन राबविण्यास सांगितले. त्यावेळी नरड हे खडसंगी येथे होते. त्यांनी आपल्याकडे पकडण्यासाठी कुठलेही जाळे उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यांनी ही माहिती कार्यालयातील पोतराजे नावाच्या कर्मचाऱ्याला देण्याचे लोहकरे यांना सांगितले. त्यानुसार लोहकरे यांनी पोतराजे यांना कोल्ह्याची माहिती देऊन वनकर्मचाऱ्यांना पाठविण्याचे सांगितले.
वनपाल नरड यांचे दुर्लक्ष
पोतराजे यांनी आमच्याकडे कर्मचारी उपलब्ध नाहीत, असे सांगत वनमजुर पाठवले. वानखेडे आणि अन्य वनमजुर त्या विहिरीजवळ पोहोचले. त्यात कोल्हा होता. मात्र, यानंतर कोल्ह्याला वाचविण्यासाठी कुठलेही प्रयत्न झाले नाहीत. वनपाल नरड यांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले. त्या कोल्ह्यावर कुठल्याही प्रकारची निगराणी ठेवण्यात आली नाही. नरड यांनी घटनेची माहितीदेखील या वनमजुरांकडून घेतली नाही. याची माहिती वरीष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकारी नैताम यांना दिली नाही.