चंद्रपूर- शहरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बगड खिडकी परिसरातील गोंडकालीन किल्ला परकोटाची शनिवारी (3 ऑगस्ट) भिंत पडली. मात्र, किल्ल्याच्या बाजूला बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीमुळे मोठी दुर्घटना टळली.
चंद्रपुरात किल्ल्याची भिंत कोसळली; सरंक्षण भिंतीमुळे मोठा अनर्थ टळला
पुरातत्व विभागाकडून एक वर्षापूर्वी या भागात संरक्षक भिंत बांधण्यात आली. यामुळे या घटनेत जीवितहानी झाली नाही.
भिंत कोसळली त्या भागात एक वर्षआधी संरक्षण भिंतीच्या बांधकामामुळे घराचे बांधकाम तोडून जागा मोकळी करण्यात आली होती. त्याच भागातील मोकळ्या जागेत बगड खिडकीच्या जवळची भिंत कोसळली यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे. संरक्षक भिंत बांधण्यापूर्वी हे घर सुध्दा किल्ल्याच्या भिंतीस लागुन होते. जर या ठिकाणी संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले नसते तर किल्ल्याचे भिंतीचे मोठ-मोठे दगड या घरावर पडले असते आणि घराच्या नुकसानीसह जीवितहानी सुध्दा झाली असती. पावसामुळे बगड खिडकीच्या बाजूचा बुरूज क्रमांक 5 च्या भिंतीचा भाग दोन दिवसात 3 वेळा कोसळला आहे.
चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन किल्ला परकोटाचे बांधकाम 550 वर्ष जुने बांधकाम आहे. या किल्ल्याची दुरावस्था व अस्वच्छता पाहुन शहरातील इको-प्रो संस्थेने किल्ला स्वच्छता अभियान सुरू केले. संस्थेचे सदस्य 11 किलोमीटर किल्ल्याची भिंत श्रमदानातून स्वच्छ करण्याचे काम मागील 780 दिवसापासून करत आहेत. या अभियानाची दखल घेत पुरातत्व विभागाने या परकोटा किल्ल्याच्या बाजूने 15 फूट अंतरावर संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू केले.