चिमूर(चंद्रपूर) - शेतातील पिकात वाढलेल्या तणाला काढण्यासाठी सद्यस्थितीत वाढलेल्या मजुरीमुळे परवडत मजूर लावणे शेतकऱ्यांना परवडत नाही. शेतकरी यामुळे मोठ्या प्रमाणात तणनाशकाचा वापर करतात. मात्र, चिमूर तालुक्यातील भिलगाव (रिठ) शेत शिवारातील शेतकरी संजय कामडी यांनी स्वतःच्या धान पिकावर जहाल तणनाशक टु फोर डी फवारल्याने त्याच्या लगतच्या शेतकरी राजू कामडी यांचे अडीच एकर आणि संभाजी भलमे यांच्या दिड एकर शेतातील कापूस पिकाला बाधा झाली. यामुळे लाखोंचे नुकसान होणार असल्याने त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
चिमूर तालुक्यात मोठया प्रमाणात धान क्षेत्र कमी होऊन कापसाच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे. त्यामुळे धान पिकात येणारे तण नष्ट करण्यासाठी वापरले जाणारे तणनाशक जपून वापरले जाते. यामध्ये अत्यंत जहाल तणनाशक टु फोर डी हे औषध वापरले जाते. हे औषध धानपिकांवर फवारल्यानंतर नजीकच्या जवळपास १ किलोमीटर क्षेत्रातील कापसाच्या पिकावर बाधा होऊन त्याच्या पानांचा चुराडा झाल्यामुळे ते गतप्राण होते. तसेच यावर कोणतीही उपाय योजना केली तरी कापसाची वाढ, फुल, पाती व बोंडांवर परिणाम होतो, अशी माहिती सर्व शेतकरी, कृषी अधिकारी तथा कृषी केंद्रास आहे. मात्र, शेतकरी संजय कामडी याने जाणीवपूर्वक टु फोर डी नावाचे जहाल तणनाशक फवारल्यामुळे नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.