राजुरा (चंद्रपूर)- दहा शेतकरी आणि शेतमजुरांचा बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात अद्यापही वनविभागाला यश आलेले नाही. त्यामुळे, संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज राजुरा येथे रास्ता रोको केला. शेतकऱ्यांनी वनविभागाच्या विरोधात नारेबाजी करीत वाघाला ठार करा, तसेच वाघाला जेरबंद करण्यात अपयशी ठरलेल्या वन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. राजुरा तालुक्यातील दहा शेतकरी, शेत मजुरांचा बळी घेणारा वाघ अद्यापही मोकळाच वावरत आहे. वाघाला ठार मारण्याची मागणी आजी-माजी आमदारांनी केली होती. मात्र, त्यानंतरही वनविभागाकडून ठोस पावले उचलल्या गेली नाहीत. वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला येणाऱ्या अपयशाने शेतकरी, शेतमजूर संतापले आहेत. त्यामुळे, शेतकरी, शेतमजूर समन्वय समितीने आज राजुरा येथे रस्तारोको केला. पंचायत समिती चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून शेतकऱ्यांनी आंदोलनास सुरुवात केली. तहसील कार्यालय समोर वन विभागाच्या विरोधात घोषणाबाजी करीत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलनकर्त्यांना शांत करण्यात आले.
त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली. उपविभागीय वनाधिकारी कल्याणी यांनी आंदोलनकर्ता शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या समस्या जानून घेतल्या. मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. जवळपास बावीस गावातील शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.