चंद्रपूर - चिमूर तालुक्यातील मासळ येथील रहिवासी श्रीकांत पाटील याने १ ऑक्टोबरला आंतरजातीय विवाह केला. यास विरोध करीत दुखावलेल्या मुलीच्या कुंटुबीयांनी २५ ऑक्टोबरला बळजबरीने मारझोड करून श्रींकातच्या घरून मुलीला पळवून नेले होते. त्याविरोधात श्रीकांतने चिमूर पोलीस ठाण्यात तथा जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी मुलीला पोलीस ठाण्यात हजर करण्याबाबत तिच्या कुटुंबीयांना बजावले. त्यानुसार मुलीच्या घरच्यांनी तिला पोलिसांपुढे हजर केले. मात्र, यावेळेस संबंधित मुलीने प्रियकराकडे राहण्यास नकार दिला. या प्रकारामुळे श्रीकांतचा हिरमोड झाला असून या प्रेमी युगुलाची कहाणीचा अर्ध्यातच शेवट झाला आहे.
हेही वाचा -पत्नीचे माहेरच्यांकडून अपहरण, पतीची पोलिसात तक्रार
याबाबत माहिती सविस्तर माहितीनुसार, 'श्रीकांतचे १ ऑक्टोबरला बौद्धविधी व विवाह नोंदणीनुसार लग्न झाले. याबाबत ६ ऑक्टोबरला मुलीच्या आई वडीलांनी मुलगी हरविल्याची तक्रार चिमूर पोलिसात केली होती. संबंधित तक्रारीवरून मुलीने ६ ऑक्टोबरला पोलीस ठाण्यात हजर होत सगळ्यां समक्ष आपल्या प्रियकर पतीसोबतच राहणार असल्याचे सांगितले होते. त्यांनतर २५ ऑक्टोबरला मुलीच्या कुटुंबीयांनी श्रीकांतच्या घरी येऊन मुलीला मारझोड करत बळजबरीने आपल्याबरोबर नेले. याबाबत श्रीकांतने चिमूर पोलीस तथा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार नोंदवत पत्नीला परत मिळवून देण्याची विनंती केली होती.