चंद्रपूर - ताडोबा-अंधारी ( Tadoba forestry ) व्याघ्रप्रकल्पात दरवर्षी केल्या जाणाऱ्या वनीकरणाबाबतच्या एकामागून एक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. ज्या खासगी नर्सरीतून रोपांची किंमत वाढवून लावली जाते. अशा, हिंगणघाट येथील एका नर्सरीतून मोठ्या प्रमाणात रोपे खरेदी केल्याची बाब नुकतीच ईटीव्ही भारतने समोर आणली होती. याबाबत ताडोबाचे संचालक जितेंद्र रामगावकर यांनी ही बाब धक्कादायक असल्याचे सांगत आपल्या स्तरावर चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. आता यापुढे ताडोबातील वनीकरनाचे आणखी एक मोठे आर्थिक घबाड समोर आले आहे. ज्यात स्थलांतरित मजुरांचे आर्थिक शोषण करून कामाची दुप्पट रक्कमेची बिले काढली जात आहे.
सावली तालुक्यातील मजुरांचे वास्तव -ताडोबातील वनीकरनात वापरल्या जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांचा शोध घेत ईटीव्ही भारतने सावली तालुका गाठला. निमगाव, चक विरखल, दाबगाव (मौशी), व्याहाड या परिसरात स्थानिक रोजगार नसल्याने प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आहे. गावांतील 90 टक्के लोकांना मजुरीसाठी बाहेर पडावं लागतं. यासाठी महिनो-महिनो हे लोक गडचिरोली, तेलंगणा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नागपूर जिल्ह्यात भ्रमंती करत असतात. उन्हाळ्यात शेतीची कुठलीही कामे नसतात. तेव्हा हे मजूर सामाजिक वनीकरण कार्यक्रमासाठी खड्डे खोदण्यासाठी जातात. ताडोबा अभयारण्यात हे काम मोठया प्रमाणात असते. सरकारच्या नियमांप्रमाणे प्रत्येक मजुराला किमान मजुरी भत्ता देण्याचे निर्देश आहेत. ही मजुरी अंदाजे 396 ते 410 पर्यंत आहे. मात्र, ही मजुरी केवळ कागदावरच दाखवली जाते. या मजुरांना केवळ 14 रुपये खड्डा प्रमाणे मजुरी दिली जाते. कधी कधी तर दहा बारा रुपयांपर्यंतच्या खड्ड्याप्रमाणे काम करावे लागते. असे, कामावर जाणाऱ्या मजुरांचे म्हणणे आहे. सावली तालुक्यातील केवळ मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक गावांत भेटी दिल्या असता ही वास्तविक स्थिती समोर आली आहे. जी ताडोबाच्या प्रतिष्ठेला गालबोट लावणारी आहे. हरिदास आनंदराव झाडे, रेमाजी कवडू मंगर, बंडू झाडे, लाल गोवर्धन, अंबादास बकाल, लाला भोयर, मुरलीधर भोयर यांच्यासारख्या अनेक मजुरांनी ताडोबात खड्डे खोदण्याचे काम केले आहे.
अशी चालते मजूर पुरविण्याची यंत्रणा -या परिसरातील मजुरांशी संवाद साधल्यानंतर ही यंत्रणा कशी चालते याचा उलगडा त्यांनी केला. गावातील मजूर पुरविणारे माणसं असतात त्यांचा वनविभागातील कर्मचाऱ्यांशी संपर्क असतो. वनविभागाच्या ज्या रेंजमध्ये वनीकरणचे खड्डे खोदण्याचे काम असते तेथील कर्मचाऱ्याकरून थेट फोन करून सांगितले जाते. किती हजार खड्डे खोदायचे आहेत. या संख्येनुसार त्याच्या दरात तडजोड केली जाते. कधीकधी 10 ते 12 रुपये प्रमाणे खड्डा देण्यात येतो. कामात जितके जास्त मजूर तितका त्यांना कमी पैसा मिळतो. त्यामुळे जास्तीत जास्त कामासाठी कमीतकमी मजूर पाठवले जातात. 10 ते 25 या संख्येने हे मजूर मग कामाच्या ठिकाणी जातात. काम पुर्ण केले की दुसऱ्या ठिकाणी जातात. नियमानुसार त्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणे गरजेचे आहे. अपवाद वगळता त्यांना नगदी रक्कम हातात ठेवली जाते. कधीकधी बँकेत देखील जमा केले जाते. मात्र, खड्ड्याप्रमाणेच ही रक्कम जमा होते. हे मजूर उन्हाळ्यात 48 डिग्रीमध्ये उन्हात राहून खड्डे खोदतात. या एक ते दोन महिन्यांत राबराब राबून ही मंडळी 20 ते 30 हजार घेऊन घरी परत येतात. याचा खुलासा ईटीव्हीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये झाली आहे. चंद्रपूर, मोहर्ली, कोलारा (कोअर) या क्षेत्रांत खड्डे खोदण्याचे काम मजुरांकडून करण्यात आल्याचे समोर आले आहे.