चंद्रपूर -चंद्रपूर परिमंडळातील बल्लारशा विभाग अंतर्गत पोंभुर्णा तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेले टोक (गंगापूर) गावातील ०२ कृषीपंप ग्राहकांचे कनेक्शन असलेल्या रोहित्रामध्ये नुकताच बिघाड झाल्याने त्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या गावात पोहचण्यासाठी पक्का रस्ता नाही, नदी दुथडी भरून वाहत होती. अशा स्थितीत नदीत नाव सोडून रोहित्र या गावात नेण्यात आले. या घटनेची दखल खुद्द राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतली. त्यांनी ट्विट करत चंद्रपूर परिमंडळाचे अभिनंदन केले आहे.
माहिती देतांना महावितरणचे अधिकारी अशी करावी लागली कसरत
पोंभूर्णा तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेले टोक (गंगापूर) गावात ०२ कृषीपंप आहेत. शांताबाई किसन दायले व टेकलू नारायण कस्तुरे हे दोन ग्राहक येथे आहेत. येथील रोहित्रामध्ये बिघाड झाला आणि वीजपुरवठा खंडित झाला. या ग्राहकांचे वीजबिल थकीत होते. त्यानंतर या ग्राहकांनी आपले थकीत विजबिल एकूण रक्कम ११,७३०/- महावितरण उपविभाग कार्यालय पोंभुर्णा येथे येऊन भरले. विशेष म्हणजे या दोघांना नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020 चा लाभ मिळाला व ते पूर्णपणे थकबाकी मुक्त झाले. महावितरण पोंभूर्णा कार्यालयाचे सहायक अभियंता कुणाल पाटील यांनी लगेच पाउले उचलत रोहित्राची जुळवाजुळव करून हे रोहित्र वीजकर्मचारी तंत्रज्ञ संतोष वाढई व कंत्राटी तंत्रज्ञ राऊत यांच्या मदतीने बदलले. बिघाड झालेला रोहित्र बदलविण्यासाठी त्याठिकाणी जाण्यास कोणताही रस्ता नसल्याने व पोंभूर्णा ते जुनगाव असा ३० किलोमीटरचा कच्च्या रस्त्याचा खडतर मार्ग असल्याने शेवटी दुथडी भरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पात्रातून नावेतून जोखमीचा प्रवास करण्यात आला. नावेत इलेक्ट्रिकल्स कंत्राटदारांचे मजूर व महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने नवीन २५ के.व्ही.ए. क्षमतेचे रोहित्र नावेमधून नेण्यात आले. बिघडलेले रोहित्र तातडीने बदलण्यात आले. अशाप्रकारे वीजपुरवठा खंडित झालेल्या दोन्ही कृषीपंप ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्वरत होऊन त्यांना आपल्या शेतीच्या धान रोवणीच्या कामास मदत झाली. या संपूर्ण कामगिरीची दखल राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतली. त्यांनी पोंभूर्णा कार्यालयाचे सहायक अभियंता कुणाल पाटील यांचा उल्लेख त्यांनी आपल्या ट्विटमध्ये करत स्तुती केली. तसेच मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांना फोन करून त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
हेही वाचा -शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाबाहेर मोठा बंदोबस्त, नारायण राणे घेणार का दर्शन?