चंद्रपूर - राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या गृहजिल्ह्यात त्यांच्याच विभागाकडून नागरिकांना चुकीचे रिपोर्ट येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्या व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, त्या व्यक्तीला आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त होत आहे. कोसारा येथील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना असा चुकीचा अहवाल आला आहे. तर सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील एका व्यक्तीला असाच पॉझिटीव्ह आणि निगेटिव्हचा अहवालात प्राप्त झाला आहे. यामुळे या नागरिकांत संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पॉझिटिव्ह रुग्णंना निगेटिव्हचे प्रमाणपत्र -
जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. 11 हजारांहून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत, तर 600 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे जितक्या चाचण्या होत आहेत, त्यापैकी जवळपास अर्ध्यावर अहवाल हे पॉझिटिव्ह येत आहेत. आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर 48 तासांत त्यांच्या चाचणीचा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून एसएमएसच्या माध्यमातून येतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जे ई-प्रमाणपत्र पाठवले जात आहेत. त्यात पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तीला चक्क निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र मिळत आहे. यामुळे अशा नागरिकांत कमालीचीची दहशत पसरत आहे. कारण हे व्यक्ती नेमके पॉझिटीव्ह आहे, की निगेटिव्ह कळायला मार्ग नाही. जर असा व्यक्ती स्वतःला निगेटिव्ह समजून बेफिकीरपणे बाहेर लोकांमध्ये मिसळला, तर तो 'सुपर स्प्रेडर'चे काम करेल. यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती निर्माण झाली आहे. शिवाय अशा व्यक्तीने उपचार सुरू केले नाही, तर त्याचा जीवही धोक्यात येऊ शकतो. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार याच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याच विभागाकडून नागरिकांना असे अहवाल प्राप्त होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा प्रकार तत्काळ थांबविणे आवश्यक आहे. अन्यथा आधीच व्हेंटिलेटरवर असलेल्या आरोग्य यंत्रणेमध्ये संपूर्णत अव्यवस्था निर्माण होण्यास वेळ लागणार नाही, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्याशी या भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.