चंद्रपूर -जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जाताना दिसत आहे. अनेकांना बेड मिळत नसल्याने हाल होत आहे. यापूर्वी एका वयोवृद्ध रुग्णाला बेड नसल्याने उघड्यावर झोपण्याची वेळ आली होती. तर आता एका मुलाला आपल्या कोरोनाग्रस्त वडिलांना बेड मिळण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तब्बल दोन दिवस बेड न मिळाल्याने आपल्या वडिलांना रुग्णवाहिकेतच ठेवण्याची वेळ त्याच्यावर ओढवली. यासाठी तो तेलंगणापर्यंत जाऊन आला मात्र, तेथेही त्याच्या पदरी निराशाच पडली. जर बेड उपलब्ध होत नसेल तर प्रशासनाने आम्हाला विषारी इंजेक्शन देऊन मारून टाकावे, अशी संतप्त भावना त्याने या व्हिडिओत व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
माझ्या कोरोनाग्रस्त वडीलांना विषारी इंजेक्शन देऊन मारुन टाका -मुलाची आर्त हाक - कोरोना रुग्णांची बेडसाठी वणवण
मुलगा सर्व खासगी कोव्हीड रुग्णालयात वणवण फिरला, मात्र येथेही त्याच्या पदरी निराशाच पडली. अखेर रात्री एक वाजता तो आपल्या वडिलांना घेऊन शेजारच्या तेलंगणा राज्यात गेला. मात्र तिथेही हीच स्थिती होती. त्यामुळे आपल्या वडिलांना रुग्णवाहिका घेऊन तो चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात परत आला. मात्र, तरीही रुग्णालयात भरती करण्यास जागा मिळाली नाही.
चंद्रपुरात कोरोना रुग्णांची बेडसाठी वणवण
Last Updated : Apr 15, 2021, 6:24 PM IST