मुंबई - काँग्रेसनेउमेदवारांची नववी यादी जाहीरकेली आहे. यात राज्यातील४ जागांचा समावेश आहे. अकोलामधून हिदायत पटेल, रामटेक येथून किशोर गजभिये, हिंगोलीतून सुभाष वानखेडे तसेच चंद्रपुरातून सुरेश धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
काँग्रेसने चंद्रपुरातून अखेर सुरेश धानोरकर यांना लोकसभेच् तिकीट दिले आहे. यापूर्वी विनायक बांगडे यांचे नाव काँग्रेसने जाहीर केले होते. या जागेवरुन बराच वाद झाला होता.
काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या सातव्या यादीत विनायक बांगडे यांना चंद्रपुरातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेस पक्षाच्या तिकिटाच्या गोंधळात हायकमांडची बांगडे यांना पसंती मिळाली होती. दिड महिन्यापूर्वी शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे त्यांना लोकसभेचे तिकीट दिले जावे, यासाठी काँग्रेसमधील वडेट्टीवार गट प्रयत्न करत होता.
चंद्रपुरातील याच जागेवरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. या संदर्भातातील त्यांचीच एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती.
भाजपने देशातील ९ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यात महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया या एका जागेचा समावेश आहे. येथून सुनिल मेंढे यांना भाजपने तिकीट दिले आहे.