महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 18, 2020, 9:21 PM IST

ETV Bharat / state

खर्रा विक्री करणाऱ्यास पाच हजार रुपये दंड; चंद्रपूर मनपाची कारवाई

महाकाली मंदिर देवस्थान परिसरात एक व्यवसायिक लपून खर्रा विक्री करत होता. ही बाब लक्षात येताच, मनपा उपायुक्तांनी छापा टाकला. यात मोठ्या प्रमाणात खर्रा व इतर साहित्य तर जप्त करण्यात आले आहे. परंतु, एवढ्यावरच न थांबता पुन्हा अशी विक्री कुणीही करू नये यासाठी सदर विक्रेत्यावर ५ हजार रुपयाचा दंडही मनपाकडून ठोठावण्यात आला.

 खर्रा विक्री करणाऱ्यास पाच हजार रुपये दंड
खर्रा विक्री करणाऱ्यास पाच हजार रुपये दंड

चंद्रपूर - खर्रा व इतर तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीस मनाई असताना या पदार्थांची लपून विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला चंद्रपूर मनपातर्फे ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मनपाचे उपायुक्त विशाल वाघ व सहायक आयुक्त धनंजय सरनाईक हे भिवापूर प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करुन परत येत होते. दरम्यान, महाकाली मंदिर देवस्थान परिसरात एक व्यवसायिक लपून खर्रा विक्री करताना आढळल्याने सदर कारवाई करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात खर्रा व इतर साहित्य तर जप्त करण्यात आले आहे. परंतु, एवढ्यावरच न थांबता पुन्हा अशी विक्री कुणीही करू नये यासाठी सदर विक्रेत्यावर ५ हजार रुपयाचा दंडही मनपाच्या वतीने ठोठावण्यात आला. तर, उपायुक्तांनी अचानक टाकलेल्या या छाप्यामुळे लपून खर्रा विकणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक उपाय केले गेले आहेत. खर्रा व इतर तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवन व विक्रीतून हा रोग पसरण्याची शक्यता लक्षात घेता शासनाने संपूर्ण राज्यात या पदार्थांची विक्री आणि साठवणुकीवर वर्षभरासाठी बंदी घातली आहे. यामुळे सर्वत्र पानटपऱ्या बंद असल्या तरी अन्य मार्गांनी गुप्तपणे या पदार्थांची विक्री होत आहे. सकाळच्या वेळेस काही व्यवसायिक सायकलला, दुचाकीला पिशव्या लावून खर्रा विक्री करत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे पालिकेने एक पथक तयार करुन अशा व्यवसायिकांचा सर्वे सुरू केला आहे.

खर्रा विक्री करताना आढळून आल्यास त्याच्यावर तत्काळ पोलीस तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने या थुंकीद्वारे कोरोना, तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा फैलाव होऊ शकतो. याकरीता कुणीही तंबाखुजन्य पदार्थ विकू नये तसेच कुणीही विकत न घेण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details