चंद्रपूर- लोकसभा निवडणुकीचा बिगुल आता वाजला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचे उमेदवार आपला विजय सुनिश्चित करण्यासाठी कामाला लागले आहेत. असे असले तरी ही निवडणूक काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी सोपी नाही. काँग्रेसकडून शिवसेनेतुन आलेले बाळू धानोरकर तर भाजपकडून सलग तीन वेळा निवडून आलेले हंसराज अहिर हे मैदानात आहेत. यांच्यासह १५ उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उभे आहेत. मात्र, आजवरचा इतिहास बघता ही लढत धानोरकर विरुध्द अहिर अशीच आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचा आढवा मतदार संघातील मागील निवडणूकांमधील राजकीय परिस्थिती -
या लोकसभेचे मावळते खासदार चंद्रपूर-वणी लोकसभा क्षेत्रातून सलग तीनवेळा निवडून आलेले आहेत. त्यांना तीनही निवडणुकीत काँग्रेसमध्ये झालेली बंडखोरी आणि तिसऱ्या पर्यायाचा फायदा मिळाला. २००४ मध्ये काँग्रेसकडून नरेश पुगलिया यांना जागा मिळाल्याने राजेंद्र वैद्य यांनी त्यांच्या विरुद्ध बंड पुकारले होते. त्यांनी बसपच्या तिकिटावर निवडणूक लढविली. याचा मोठा फटका पुगलियाना तर अहिरांना याचा फायदा झाला. ते या निवडणुकीत निवडून आले. २००९ मध्ये अहिर आणि पुगलिया यांच्या सोबत शेतकरी संघटनेचे अॅड. वामनराव चटप देखील अपक्ष म्हणून उभे राहिले. यावेळी ही तिरंगी लढत ठरली. मात्र, अहिर यांनी विजयश्री खेचून आणला. २०१४ यामध्ये काँग्रेसतर्फे राज्याचे माजी सांस्कृतिक आणि पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांना तिकीट मिळाली तर आपकडून वामनराव चटप हे उमेदवार होते. या दोघांवरही मात करीत अहिर यांनी पुन्हा चंद्रपूर लोकसभेवर विजय मिळविला.
२०१४ लोकसभा निवडणूक -
हंसराज अहीर (भाजप) - ५ लाख ८ हजार ४९ मते
संजय वामनराव देवतळे, काँग्रेस - २ लाख ७१ हजार ७५० मते
वामनराव चटप, आप - २ लाख ४ हजार ४१३ मते
मतदार संघातील सध्याची राजकीय परिस्थिती -
मागील तीन वेळेपासून चंद्रपूर मतदार संघातील लोकसभा निवडणूक ही तिरंगी ठरली होती. मात्र, यावेळी चटप हे या लढतीत नाही. त्यांच्या इतका मातब्बर नेता तिसरा पर्याय म्हणून नाही. मात्र बहुजन वंचित आघाडीकडून अॅड. राजेंद्र महाडोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे हे या निवडणुकीत रंगत आणू शकतात. मात्र, त्यांच्या पारड्यात नेमके किती मते पडतात हे येणारा काळच सांगू शकतो. तीन वेळापासून खासदार असलेले अहिर यांच्याविषयी लोकांमध्ये नाराजी आहे हे दिसून येत आहे. जनसंपर्क दांडगा असला तरी स्थानिक प्रश्नावर त्यांनी काही ठोस केल्याचे दिसून येत नाही, अशी नाराजी लोकांची आहे.
तर काँग्रेसकडून अखेरच्या क्षणी बाळू धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली. चंद्रपूरच्या तिकीट वाटपावरून पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. बाळू धानोरकरांना तिकीट देण्याआधी काँग्रेसची माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांनी उमेदवारी देण्यात आली होती. बाळू धानोरकर पूर्वी सेनेत होते. २०१४ विधानसभा निवडणूकांवेळी भाजप आणि सेनेची युती न झाल्याचा फायदा धानोरकरांना झाला. ते वरोरा-भद्रावती मतदारसंघातून भाजपवासी झालेले माजी मंत्री संजय देवतळे यांना पराभूत करून निवडून आलेत. स्थानिक पातळीवर भाजप सेनेला संपवित आहे, त्यामुळे युती नको असे मत बाळू धानोरकर होते. त्यामुळे आपल्या राजकीय भविष्याची पर्वा करीत ते काही दिवसांपासूनच काँग्रेसच्या संपर्कात होते.
लोकसभा निवडणुकीत युती झाल्याने त्यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत आमदारकीचा राजीनामा दिला. विनायक बांगडे यांना देण्यात आलेली उमेदवारी बदलून धानोरकरांना तिकीट देण्यात आले. त्यामुळे काँग्रेसचा एक गट नाराज झाला. याचा फटका धानोरकरांना बसू शकतो. दलित आणि मुस्लिम समाजाचा मोठा वर्ग हा काँग्रेचा मतदार आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असल्याने हा ही फटका काँग्रेसला बसू शकतो. तसेच तिसरे आव्हान नसल्याने अहिर यांना आता थेट धानोरकरांशी मुकाबला करावा लागेल. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरेल.
स्थानिकांचे प्रश्न -
तीन वेळापासून खासदार असलेले अहिर यांच्याविषयी लोकांमध्ये नाराजी आहे हे दिसून येत आहे. जनसंपर्क दांडगा असला तरी स्थानिक प्रश्नावर त्यांनी काही ठोस केल्याचे दिसून येत नाही, अशी नाराजी लोकांची आहे. कोळशापासून युरिया बनविण्याचा कारखाना आपण चंद्रपुरात आणणार अशी घोषणा त्यांनी केंद्रीय खते मंत्री झाल्यावर केली होती. हा कारखाना अद्याप जिल्ह्यात आला नाही. रोजगारनिर्मितीसाठी देखील आपण प्रयत्न करणार असेही सांगितले होते. मात्र, आज उद्योग घायकुतीस आले आहेत. गोपानी, मुरली ऍग्रो, गुप्ता कोल वॉशरीज सारखे मोठे कारखाने बंद झाले आहेत. लॉयड मेटल, बिल्ट कागद कारखाना, माणिकगड सिमेंट सारख्या कंपनीने देखील आपले कामगार कमी केले आहेत. यामुळे हजारोंच्या संख्येने कामगार बेरोजगार झाले आहेत.
उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी नसल्याने त्यांच्याकडून काही दिवसांआधी मोर्चा काढण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, प्रदूषणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या सर्व समस्या अद्याप कायम आहेत. यामुळे अहिरांवर निष्क्रियतेचा ठपका लागला आहे. त्यांनी वेकोलीच्या प्रकल्पग्रस्तांसाठी आणि रेल्वे थांबे देण्यासाठी प्रयत्न केले. त्यात यशही आले. मात्र, यामुळे देखील त्यांच्यावर राजकीय टीकेची झोड उठली आहे.
हंसराज अहीर मागील १५ वर्षापासून खासदार असूनही मतदार संघात विकास कामे झाले नसल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. तर काँग्रेसकडून यावेळी उमेदवार आयात करण्यात आला आहे. आयात करण्यात आलेले धानोरकर भाजपच्या अहिरांना हरवणार, की आयात केलेल्या उमेदवारांमूळे काँग्रेसला धूळ खावी लागणार याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.