महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही; चंद्रपुरातील शेतकऱ्याची व्यथा

पावसाने दिलेल्या खो-मुळे शेतकरी त्रस्त आहेत. पण, पेरणी करूनही काही जंगली प्राणी शेतात घुसून पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

पिकाचे झालेले नुकसान

By

Published : Jul 17, 2019, 7:06 PM IST

चंद्रपूर- दरवर्षीप्रमाणे मोठ्या उमेदीने सोयाबीनची पेरणी केली, ती जंगली डुकरांनी फस्त केली. पुन्हा पैशांची जुळवाजुळव करून पेरणी केली, यावेळी देखील जंगली डुकरांनी ती भुईसपाट केली. कर्जाचा डोंगर वाढला आहे, अशावेळी शेती करायची तरी कशी? त्यामुळे माझ्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, अशी व्यथा चिमूर तालुक्याच्या बोथली येथील हतबल झालेल्या प्रवीण घुगरे या युवा शेतकऱ्याने मांडली आहे. मात्र, ही व्यथा त्याच्या एकट्याची नसून जंगलालगत शेती करणाऱ्या हजारो शेतकाऱ्यांची आहे.

...तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही; चंद्रपुरातील शेतकऱ्याची व्यथा

वन्यजीवांच्या प्रादुर्भावामुळे या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. राज्यात सर्वाधिक जंगल हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. या जंगलाचे मोठे क्षेत्र हे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात येते. हे जंगल सरंक्षित असल्याने येथे वन्यजीवांचे मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. हे वन्यजीव अनेकदा जंगलालगत असलेल्या परिसरात भ्रमंती करीत असतात. चिमूर तालुक्यातील मोठा परिसर हा ताडोबा प्रकल्पाला लागून आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतो. हीच स्थिती मानव वन्यजीव संघर्ष निर्माण होण्यास कारणीभूत ठरली आहे. जुलै महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जोखीम पत्करून नाईलाजाने पेरणी केली. मात्र, अंकुर निघायच्या आतच ही पेरणी वन्यजीव फस्त करीत आहेत. यामध्ये रानटी डुक्कर, रोही, नीलगाय, सांबर, हरीण या तृणभक्षी वन्यजीवांचा समावेश आहे. त्यामुळे शेती करायची तरी कशी, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. या समस्येमुळे बोथली येथील प्रवीण घुगरे या युवा शेतकऱ्यासमोर जगण्यामरण्याचा प्रश्न उभा राहीला आहे.

पहिली पेरणी रानटी डुकरांनी फस्त केली. कर्ज घेऊन त्याच्यावर दुबार पेरणीची वेळ आली. ही पेरणीही डुकरांनी नष्ट केली. कर्जाच्या ओझ्याखाली हा शेतकरी जगात आहे. त्याला कुठलीही नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही. त्यामुळे आपल्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही अशी भावना त्याने व्यक्त केली. महाराष्ट्रासारख्या राज्यात बळीराजाची अशी परिस्थिती निर्माण होणे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. याकडे शासनाने त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा बळीराजाची हिम्मत आणखी खचत जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details