चंद्रपूर- जनगणनेत ओबीसींची जातनिहाय नोंदणी करण्यात यावी या प्रमुख मागणीसह येत्या 26 नोव्हेंबरला विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ओबीसी जनगणना समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले असून जिल्हाभरात या दिवशी मोर्चे काढण्यात येणार आहेत.
ओबीसींची जातनिहाय जनगणना करा; 26 नोव्हेंबरला चंद्रपुरात मोर्चाचे आयोजन
देशात ओबीसी वर्गाला आरक्षण देण्यात आले. यामध्ये अनेक जातींचा समावेश आहे. मात्र, या वर्गातील लोकांची नेमकी काय स्थिती आहे? हे अजूनही कळाले नाही. कारण या वर्गाची कधीच जातीनिहाय जनगणना झालीच नाही. त्यामुळे या वर्गातील समाजाची नेमकी किती प्रगती झाली की अधोगती, आर्थिक-सामाजिक दृष्टीने ह्या वर्गाची काय स्थिती आहे? हे कळायला मार्ग नाही. यातूनच ओबीसी वर्गाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी पुढे आली. गेल्या अनेक वर्षांपासून ती आहे. मात्र, हळूहळू या मागणीने जोर धरू लागला. हीच मागणी घेऊन संविधान दिनी म्हणजेच 26 नोव्हेंबरला जिल्हाभरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी बळीराज धोटे, डॉ. राकेश गावतुरे यांच्यासह समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
ह्या मोर्चाला कुणबी समाज संघटना, अखिल भारतीय माळी महासंघ, तैलिक महासंघ, धनगर समाज, भोई समाज, बेलदार समाज, कुंभार समाज, सुतार समाज, लिंगायत समाज, गानली समाज, वैष्णव समाज, न्हावी समाज, शिंपी समाज, भावसार, पांचाळ, गोंडी लोहार, धोबी, कोहळी, पद्मशाली, मुस्लीम ओबीसी समाज आदी सामाजिक संघटनांचा सहभाग असणार आहे.