महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिमुकल्या भावंडांचा संचारबंदीतच 'रमजान'; महिनाभर एक वेळ उपाशी राहून 'यांना' केली मदत

रमजान हा महिना अत्यंत पवित्र समजला जातो. यात ठेवलेल्या उपवासांना सर्वाधिक महत्त्व असते. हा पर्व पुढल्या आठवड्यापासून सुरू होत आहे. मात्र, या चिमुकल्यांनी यापूर्वीच आपला रमजान पूर्ण केला. तेही मानवी सौहार्द, शांतता नांदावी यासाठी.

Ramjan
महेक आणि निहाल

By

Published : Apr 18, 2020, 7:08 PM IST

Updated : Apr 18, 2020, 7:26 PM IST

चंद्रपूर- रमजान हा मुस्लीम समाजाचा पवित्र महिना. या महिन्यात एकवेळचा कडक उपवास करुन आपल्या परमेश्वराचे स्मरण केले जाते. सर्वत्र शांतता, सौहार्द निर्माण व्हावे, याची कामना केली जाते. मात्र सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे संचारबंदी आहे. यात फसलेल्या कोट्यवधी लोकांना उपाशी झोपत दिवस ढकलावे लागत आहेत. यापासून देशाला सावरण्यासाठी मदतीची गरज आहे. ही गोष्ट या चिमुकल्या भावंडांच्या लक्षात आली. जेव्हा देशात संचारबंदी लागू करण्यात आली, तोच त्यांचा 'रमजान' झाला. एकवेळ उपाशी राहण्याचा संकल्प करुन त्यांनी महिन्याचा पॉकेटमनी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री सहायता निधीत टाकला. ह्या चिमुकल्या भावंडांनी दाखवलेली संवेदनशीलता आताच्या स्थितीत नक्कीच प्रेरणादायी आहे.

चिमुकल्या भावंडांचा संचारबंदीतच 'रमजान'; महिनाभर एक वेळ उपाशी राहून केली प्रधानमंत्री, मुख्यमंत्री सहायता निधीत मदत
चंद्रपूर जिल्ह्यातील बिबी येथील मुस्लीम समाजातील हबीब शेख यांची दोन मुले. महेक बारा वर्षांची तर निहाल हा सहा वर्षांचा आहे. बाहेर काय घडत आहे, हे टीव्ही, पेपरच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंतही पोहोचत आहे. अनेक लोकांना अन्नाविनाच दिवस काढावे लागत आहेत, तर काहींवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीतही काही लोक जातीय रंग देऊन सांप्रदायिकता पसरवत आहेत. मात्र, ह्या चिमुकल्यांना त्याचा मागमूस नाही. त्यांना कळते ते केवळ प्रेम, आपुलकी. ह्याच आपुलकीतून त्यांनी दररोज एकवेळ उपाशी राहून मदत करण्याचा संकल्प केला. आईवडिलांनी देखील त्यांच्या ह्या भावना आणि कृतीला आपला भक्कम पाठिंबा दिला. संचारबंदी लागू झाल्यापासून त्यांनी सकाळी उपाशी राहायचे पालन सुरू केले.

टीव्हीवर बातम्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात, याकडे त्यांचे लक्ष असते. काही वेळ कुराण पठण, चेस खेळणे तर शाळेचा अभ्यास घरीच बसून ऑनलाईन करणे असा त्यांचा दिनक्रम सुरू आहे. आज याला 20 दिवसांपेक्षा अधिक काळ झाला. त्यातून मिळालेल्या पॉकेटमनीची रक्कम एक हजार रुपये त्यांनी पंतप्रधानांच्या पीएम रिलीफ फंड आणि मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली. सर्व धर्म प्रेम, आपुलकी, सौहार्दतेचीच शिकवण देतात. याचे पालन करणाऱ्यालाच खरे माणूस म्हटले जाते. रमजान हा महिना अत्यंत पवित्र समजला जातो. यात ठेवलेल्या उपवासांना सर्वाधिक महत्त्व असते. हा पर्व पुढल्या आठवड्यापासून सुरू होत आहे. मात्र, या चिमुकल्यांनी यापूर्वीच आपला रमजान पूर्ण केला. तेही मानवी सौहार्द, शांतता नांदावी यासाठी.

Last Updated : Apr 18, 2020, 7:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details