चंद्रपूर- मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट बघण्यासाठी गेलेल्या मोदी कुटुंबीयांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. तसेच राजकीय वरदहस्ताचा उपयोग करून उलट त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा आरोप पायल मोदी यांनी पत्रकार परिषदेत केला.
बुधवारी रात्री मुंबई येथील उद्योजक स्वप्नील मोदी हे पत्नी पायल मोदी, सासू आणि सासऱ्यांसह शहरातील मिराज मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट बघण्यासाठी गेले होते. त्यांची सीट बरोबर नसल्याने बाजूच्या रिकाम्या सीटवर बसण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. ते बसले असताना काही वेळानंतर तिथे अमेय बोनगीरवार आपल्या कुटुंबासह आले. ही सीट आपली असून ती खाली करा, असे त्यांनी सांगितले. मोदी यांनी कर्मचाऱ्यांनीच ही सीट आम्हाला दिली आहे. तुम्ही दुसऱ्या सीटवर बसा, असे सांगितले. यावरून दोघात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी बोनगीरवार यांनी आपण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जवळचे नातेवाईक असून तुम्हाला बघून घेईन, अशी धमकी दिली.