चंद्रपूर - राज्यात सर्वत्र एसटी कर्मचाऱ्यांचा उद्रेक उफाळून येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना वेतन मिळाले नाही. याच विवंचनेत दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. यावर राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे म्हटले. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत सकारात्मक नाही, असे म्हणत या प्रकरणातील दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
राज्य परिवहन मंडळाची आर्थिक परिस्थिती आधीपासूनच बेताची होती. अशातच कोरोनाच्या काळात सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प होती. याचा फटका एसटी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला. कर्मचाऱ्यांचे पगार थांबले. अनेकांना स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली. आता दिवाळी तोंडावर आहे. मात्र ती साजरी करण्याऐवजी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वेतन मिळण्याची मागणी घेऊन त्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. त्यानुसार आज एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर आंदोलन सुरू केले. तर जळगाव आणि रत्नागिरी येथे एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. यामुळे कर्मचाऱ्यांची स्थिती किती विदारक आहे हे समजून येते. यावर राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.
काय आहे मुनगंटीवारांची पोस्ट
एसटी कर्मचाऱ्यांची आत्महत्या दुर्दैवी; माजी अर्थमंत्री मुनगंटीवारांनी शेअर केली पोस्ट - sudhir mungantiwar on ST employee suicide
दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. यावर राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे म्हटले आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय.
वेतनाअभावी दोन एसटी कर्मचाऱ्यांची केलेल्या आत्महत्या फार दुर्दैवी आणि वेदनादायी आहेत. वेळोवेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सरकारपुढे मांडून सुद्धा हे सरकार यावर सकारात्मक दिसत नाही. याचाच दुदैवी परिणाम आज आपल्याला पाहायला मिळत आहे. जळगाव आणि रत्नागिरी येथे झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येने त्यांच्या कुटुंबांचा आधार निघून गेला आहे. माझ्या पूर्ण संवेदन त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. या प्रकरणातील दोषींवर त्वरित कारवाई व्हावी, अशी मी सरकारकडे करतो, असे मुनगंटीवार म्हणाले.