चंद्रपूर - राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात मोठी चर्चा सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, यासंदर्भात ओबीसी नेते जागरूक झाले आहेत. राज्यभरात ओबीसी नेत्यांनी विविध दबाव गट स्थापन करत राज्य सरकारला अशा कोणत्याही कृती विरोधात निर्वाणीचा इशारा दिला आहे. यासंदर्भात ओबीसी नेत्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात 26 नोव्हेंबर संविधान दिनी जिल्हास्तरीय ओबीसी महामोर्चाचे आयोजन केले आहे. या महामोर्चाच्या जनजागृतीसाठी आज बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
ओबीसी महामोर्चाच्या जनजागृतीसाठी बाईक रॅली; 26 नोव्हेंबरला निघणार महामोर्चा - चंद्रपूर ओबीसी महामोर्चा बातमी
ओबीसी नेत्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात 26 नोव्हेंबर संविधान दिनी जिल्हास्तरीय ओबीसी महामोर्चाचे आयोजन केले आहे. या महामोर्चाच्या जनजागृतीसाठी आज बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
संविधान दिनी महामोर्चाचे आयोजन-
गत महिनाभर या महामोर्चासाठी विविध तालुक्यातून सहविचार सभा-जनजागृती बैठका होत आहेत. 26 नोव्हेंबरच्या ओबीसी महामोर्चाच्या जनजागरणासाठी आज चंद्रपूर शहरातून एका भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ऐतिहासिक दीक्षाभूमीवरून निघालेली ही रॅली ओबीसी संघर्षाचा जयघोष करत शहराच्या विविध मार्गांवरून भ्रमण करत होती. ओबीसी जात समूहातील विविध घटकातील संघटनांनी 26 नोव्हेंबरच्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी कंबर कसली आहे. आजच्या बाईक रॅलीमध्ये देखील याची चुणूक दिसली. ओबीसी घटकातील विविध जात संघटनांनी या रॅलीत आपला सहभाग दर्शविला. ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी, मराठा समाजाला ओबीसींच्या टक्क्यातील आरक्षण देऊ नये, नोकरी व शिक्षण क्षेत्रातील ओबीसींचा टक्का जनसंख्येनुसार निर्धारित व्हावा, या व इतर अनेक मागण्यांसाठी 26 नोव्हेंबर रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 26 नोव्हेंबरचा मोर्चा सर्वार्थाने ऐतिहासिक ठरेल, अशी भावना संयोजकांनी व्यक्त केली आहे.