चंद्रपूर - आपल्या कल्पकतेसाठी व सामाजिक दायित्वासाठी अग्रेसर असणाऱ्या चंद्रपूर येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राने कोरोना संसर्गाच्या काळात कार्यालयीन व घरी वापरासाठी उपयोगी ठरणारे बांबूचे सॅनीटायझर स्टँड तयार केले आहे. लवकरच बाजारात हे स्टॅन्ड जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी दिली आहे.
बांबू संशोधन केंद्राची किमया; आकर्षक बांबू सॅनिटायझर स्टँडची निर्मिती
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातून बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचे कार्य सुरू आहे. मोठ्या प्रमाणात कौशल्य आधारित रोजगार देणाऱ्या या संशोधन केंद्रातून अनेकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कौशल्य प्राप्त झाले आहे. या केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे बांबूपासून सामान्य माणसाच्या जीवनात उपयोगात येणाऱ्या स्वस्त व आवश्यक टिकाऊ वस्तू तयार करणे होय.
या केंद्रातून आत्तापर्यंत बांबूपासून सायकल, तिरंगी झेंडा, बांबूची तलवार, बांबूपासून तयार झालेले घरी वापरता येणारे सोफासेट, खुर्च्या - टेबल, याशिवाय या केंद्राची सुप्रसिद्ध बांबूची कव्हर असणारी डायरी देखील प्रसिद्ध आहे. या केंद्रामार्फत बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याच्या स्पर्धा देखील घेतल्या जातात. दरवर्षी या ठिकाणी बांबूपासून गणेश मूर्तीची निर्मिती, बांबूपासून राख्या तयार करणे अशा विविध उपक्रमाला राबविण्यात येते.
मेकॅनिकल इंजिनियर व भारतीय वन सेवेचे सनदी अधिकारी असणारे राहुल पाटील यांच्या कल्पकतेतून याठिकाणी विविध प्रयोग केले जातात. त्यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणच्या बांबूपासून वस्तू बनविण्याच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये देखील विद्यार्थ्यांकडून अनेक वस्तू तयार केल्या जातात. याठिकाणी पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या योगिता साठवणे यांच्या कल्पनेतून बांबूपासून त्यांनी सॅनीटायझर स्टँड तयार करण्याची कल्पना पुढे आली. या ठिकाणी डिझायनर म्हणून काम करणाऱ्या किशोर गायकवाड हस्तशिल्प निर्देशक व राजू हजारे बांबू कारागीर यांनी या कल्पनेला राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनात आकार दिला. तसेच सुशील मंतावर वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या नियोजनात काम करण्यात आले. बांबू स्टॅन्ड चर्चेचा विषय असून लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.